पान:कथाली.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निरुपमाने नवीनजवळ मेट्रनने सांगितलेली गोष्ट सांगितली. त्यानेच तिला 'मैत्री तुझी माझी' या संस्थेत नेले होते. तेथील प्रतिभाताईंनी डॉ. कुंदा वैद्यांना चिठ्ठी दिली होती. सप्रयोग पॅथॉलॉजी लॅबमधून आलेला रिपोर्ट पाहताच प्रतिभाताईसुद्धा चक्रावून गेल्या होत्या. रमेशचा आणि तिचा जेमतेम वर्षभराचा सहवास. त्यातही त्याच्यातलं कमी होत जाणारं त्राण. पण निसर्गाचे नियम कोणाला टाळता येणार? निरुपमाच्या रक्ताचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
 ती बारावीन असेल तेव्हा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एड्सवर एक पथनाट्य सादर केले होते. ते पाहताना किती लाज वाटली होती आणि हसूही आले होते. वाटलं होतं कसल्या गचाळ घाणेरड्या विषयावर पथनाट्य करताहेत हे विद्यार्थी? पण ते नाटक नव्हतं. ते एक विदारक सत्य होतं. आज तिच्याच अंगणात उभं राहिलेलं, मृत्यूचं रूप घेऊन!
 जीव गुदमरून गेला. श्वास घेता येईना. अंग घामानं दरदरून गेलं. ती तटकन् उठून बसली. शेजारी आईने ठेवलेल्या तांब्यातलं पाणी गटागटा पिऊन टाकलं. उठून ट्यूब लावली. तो प्रकाशही खूप धीर देणारा वाटला. पण तेव्हा? त्याक्षणी विचार करता करता कधी डोळा लागला कळलं नाही.
 "काकू, निरू उठली नाही का अजून? तिचा रिपोर्ट घेऊन आलोय मी. तिच्या रक्तात पांढऱ्या पेशी सात हजार आहेत. म्हणजे एकदम गुड आणि लिम्फोसाईटसही साठ आहेत. काकू पांढऱ्या पेशी चार हजारांनी खाली आणि लिम्फोसाइटस् चाळीसच्या खाली गेल्यातर संसर्गाची... इन्फेक्शनची शक्यता वाढते. काकू तुम्ही प्रथिनयुक्त आहार देता. किती काळजी घेता हो. आणि रक्तात हिमोग्लाबीनही अकरा आहे. काकू, पण डॉक्टरांनी सांगितलंय की, परिसर खूप स्वच्छ ठेवा. ती काळजी मी घेईन. म्युनिसिपालटीच्या लोकांना सांगून आपण ते करतोच, काकू, निरूला सांगा, हार मानायची नाही. आपण आहोत ना तिच्याबरोबर. बोलताना त्याचा आवाज भरून आला.
 "उठवा, निरूला. मी आज तिच्या हातचा चहा पिणार आहे. आपल्या सीमांचं रक्षण करण्यासाठी मृत्यूला सामोरे जाणारे जवान हसतखेळतं सीमेवर जातात. तसंच निरूनेही एड्सला सामोरं जायचं. तो भयाण शत्रू तिच्यापर्यंत पोचू नये म्हणून नवनवीन कुंपणं बांधायला आहोतच की आपण..." 'उठ नीरू' असे म्हणत.
 डोळ्यातलं पाणी.मागे हटवीत नवीनने तिच्या अंगावरचे पांघरुण ओढले.

कॅलेंडर/ १७