पान:कथाली.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "मुली, पदवीधर असतील तर कारकुनाची जागा मिळाली असती. इथे महिला कामगारांसाठी पाळणाघर आहे. तिथे तुला नोकरी देतो. पंधराशे रुपये पगार देऊ. मान्य असेल तर सांग. त्याला कामावरून कमी केले आहे." असे सांगून साहेब निघून गेले.
 नंतरचे सहा महिने... पहाटे उठून स्वयंपाक. दिवसभर ऑफिस, घरी आल्यावर रमेशची सुश्रुषा. फरक काहीच पडत नव्हता. आणि मग तो दिवस.
 त्या आठवणींनीही निरुपमच्या अंगावर शहारे आले. ससून हॉस्पिटल्या त्या वॉर्डीच्या मुख्य डॉक्टरांनी तिला बोलावून घेतले होते. निरुपमाचा काहीसा फिकट, अशक्त, निष्पाप चेहरा पाहून त्यांनी सिस्टरनाही बोलावून घेतले. पेशंटचा रिपोर्ट नीट समजावून देण्याचे सांगून "पुअर गर्ल..." असे पुटपुटत ते त्यांच्या खोलीच्या बाहेर पडले.
 रमेशला दवाखान्यातून हालविण्याखेरीज दुसरा मार्गच नव्हता फोन केल्यावर भैयाजी येऊन गेले. त्यांनी दवाखान्याचा रिपोर्ट वाचून त्रयस्थपणे बाजूला ठेवला.
 "निरू, मी नागपूरहून दोन दिवसांची रजा घेऊन आलोय. हे दोन हजार रुपये जवळ ठेव. तुझ्या आईवडिलांना बोलावून घे. पण...", अर्धवट वाक्य सोडून ते मुकाट बसले.
 आपण पदवीच्या दुसऱ्या वर्षाला असूनही किती अडाणी मुर्ख आहोत, याचा तिला त्याच क्षणी साक्षात्कार झाला होता. दोन दिवसातच रमेश होत्याचा नव्हता झाला. त्याला उचलायलाः चार माणसंही मिळाली नाहीत. दवाखान्यातच्या शववाहिकेतून त्याच्या देहाची विल्हेवाट लावीपर्यंतचा वेळ. शेवटच्या वेळी चरकात घातलेल्या उसाच्या निर्जीव चोरट्यासारखी. रमेशच्या मृत्यूनंतर आई अण्णांबरोबर परत गावी येताना तिला वॉर्डाच्या मुख्य मेट्रननी सांगितलेली गोष्ट आठवली होती. त्या म्हणाल्या होत्या,
 "बेटा, तुझे रक्तही तपासून घे. खरं तर इथेच तपासून घेणे बरे होते. पण तुझ्याजवळ ना आई-बाप, ना सासू-सासरे. दोन दिवस तरी हा काढेल की नाही गॉड नोज. तेवढं मात्र कर बरं." रमेश जाण्यापूर्वी दोनच दिवस आधी आई अण्णा आले होते. रमेश वारल्यावर आई अण्णांच्या घरी परतल्यावर अनेकजण येऊन गेले. पहिल्यांदा नवीन येऊन गेला. अण्णांचं पिणं वाढतच होतं. आई अडाणी.

१६ /कथाली