पान:कथाली.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माय काय धंदा उरती त्ये म्हाईत न्हाई. त्याला वाटतं ममईच्या म्युन्शीपालटीत माय रस्ते झाडायचं काम करती...
 ...ताई माझं रूप लई उजवं होतं. एक मालक लई भाळला माझ्या रूपावर. दर एक दोन दिसाआड यायचा. मी बी तो म्हनंल तस्सं, करायची. त्याच्याकडे एक पुस्तक व्हतं. त्यातलं पाहून काय... काय कराया सांगायचा. मी बी तो म्हनलं तशी वागायची. मला लई छान वाटायचं. त्यानंच ही खोली इकत घेऊन दिली. धा तोळे सोनं बी अंगावर घातलं. त्यावेळी मी भैनीला चार चार हजार रुपये बी द्यायची. भैनच ती. जीवाला जीव देणारी. लेकरू बाळ नव्हत. मेहुणा बी मयाळू. त्याला मी काय करती त्ये ठाऊक नव्हतं. त्याला बी वाटे की सुशी ममईत झाडू मारती. तो ग्येला मरून. बार्सीत घर हाये. मिलमंदी कामाला होता. माझ्या लाडक्या मालकाची खूण म्हंजी माजी रानी. हेमा, चंद्याला वाटतं त्याचा नि तिचा बाप येकच हाय.
 ताई, लेकरं माझ्यावर लई माया करतात. त्यांची माय पैशे कशी मिळवते, रानीचा जलम कसा झाला हे त्यांना कळलं तर...? अशात लई भ्या वाटतं. रानील तर मी लई शिकविणार हाये. तिच्या बापाला मी फोटू दावायची. अक्षी हेमामालिनी वानी गोल गोंडस चेहेरा. मालकानीच हे नाव सांगितला तिच्यासाठी पैशेबी ठेवलेत. बार्सीच्या बँकीत. पन अशात ती हट्ट करत्ये. म्हनते. मला पप्पांकडे ने त्ये का येत न्हाईत. उद्या मोठी झाली की काय सांगू तिला? त्यो मायाळू दादाप्पा... मालक ॲक्शिडेंटात मरून ग्येला"
 पुढचा दिवस उगवताच असतो. तसे मागोमाग उगवणारे व मावळणारे दिवस, महिने आणि वर्षे. मीनू त्या आज सुशीला मनापासून आठवते आहे.
 भलेही केस स्टडी करीत असली तरी तेव्हा मीनूचे वय जेमतेम बावीस वर्षांचे. मैत्रीच्या एक अगदी कोमल पण चिवट बंध दोघीत जोडला गेला होता. आजही आहे. कुठे असेल सुशी?... हा प्रश्न नेहमीच मनासमोर येई.
 गेले महिनाभर मेळघाट, सेमाडोह, चंद्रपूर, गडचिरोली भागात हिंडून तिथल्या आदिवासींच्या साठीच्या विविध प्रकल्पांच्या कामांना भेटी देऊन त्यात काय त्रुटी आहेत, काय हाती आले आहे याची मांडणी करून, आढावा घेण्याचे काम मीनू आणि सद्याने घेतले आहे. काही वर्षे मीनूने नोकरी केली. नोकरी चांगली होती.

६ /कथाली