पान:कथाली.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पगार खूप होता. पण मानसिक समाधान फारसे नव्हते. सरकारी नोकरी म्हटली की असेच असते. नुस्ती भटकंती आणि काम चालू आहे, उत्तम चालले आहे. हे दाखविण्यासाठी, वरिष्ठांच्या हुकुमावरून कागदी घोडे नाचवायचे. आठ वर्षे नाचवले घोडे. पण नंतर कायमचा रामराम ठोकला. औरंगाबादेत छोटेस घर घेतले. मीनूने सादाशी लग्न करावे म्हणून आई-वडील, भाऊ सगळ्यांनी आग्रह केला. परंतु या काहीशा वेगळ्या कामात बुडून गेल्यापासून लग्न करावेसे वाटले नाही. पुरुषाच्या शरीराच्या स्पर्शाची ओढ जाणवली नाही. किंवा असेही असेल. परित्यक्ता, एकाकी, विधवा अन्याय सोसणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न जाणून त्यांचे विविध मार्गांनी पुनर्वसन करण्याचे सुरुवातीला केलेले काम, गेल्या दहा वर्षांपासून विविध स्वयंसेवी व अशासकीय प्रकल्पांच्या कामांचे मूल्यांकन करून त्याचा लेखी दस्तऐवज तयार करण्याची फ्रीलांन्सिंग पद्धतीने घेतलेली जबाबदारी, गुत्तं घेऊ केलेले काम म्हणा की, यात मीनू इतकी अडकली की, शरीराच्या भुका, अपेक्षा जाणवल्याच नसतील. ती काय किंवा सदा काय. दोघेही सारखेच. गेल्या पंचवीस, अठ्ठावीस वर्षांचा सहवास. घट्ट मैत्री. टाळ्यांची देवघेव. चिमटे काढणं, पाठीवर थाप मारणे, हे सारं सहजपणे.
 लिंगसमभावाची संकल्पना विविध संघटना, संस्थांतील शिबिरांतून कार्यकर्त्यांच्या तना-मनावर गोंदविताना आपल्या लिंगाशी जोडलेल्या मानसिक, शारीरिक भावना, जाणिवा... अपेक्षा आटून गेल्या असतील का, असा प्रश्न मीनूला अधून मधून सतावत असे. सदाजवळ हे सारे बोलून दाखविले की, तो तिच्या डोक्यावर टपली मारून "मुर्ख आहेस" असे म्हणे. मेळघाटातून आल्यापासून मीनू काहीशी अस्वस्थ आहे. आज संध्याकाळी लांब थेट माइल स्टोनपर्यंत फेरफटका मारून आली. लहानपणचे, कॉलेज जीवनातले फोटो काढून बसली. असिम आणि गीताला फोन लावून गप्पा झाल्या त्यातही उल्फाची चळवळ , जवळ आलेल्या बिहूची तयारी. यावर चर्चा. तरीही मन अशांत. शेवटी तिने वसूला पत्र लिहायला घेतले,
 "प्रिय वसू, परवा सकाळी मी आणि सदा मेळघाटातून औरंगाबादेस परतलो. रात्री जाग आली तेव्हा अंगावरून कुणाचा तरी हात फिरतोय असा भास झाला. पण तो भास नव्हता. ते हात सद्याचे. मी दूर होऊ लागले तर त्याने होता नव्हता जोर एकवटून मला गच्च आवळून धरले...

"मैत्र' /७