पान:कथाली.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हैन्याला पैशे पाठविते मी. येवढे हजार रुपये बार्शीला पाठवायचे. हा पत्ता." एका जाड कागदावर पत्ता लिहिलेला होता. "शंभरच्या दहा नोटा आणि वर पन्नास हाईत. आता पैशे पाठवाया बी पैशे लागतात." असे म्हणत तिने पैशे मीनूजवळ दिले. सुशीची ओळख अधिक गडद होत गेली. सुशीची केस... सुशीची जीवन कहाणी मीनूने "केस स्टडी" म्हणून अभ्यासायची ठरविली.
 सुशी केज तालुक्यातल्या चिंचोलीची. सातवीपर्यंत शिक्षण झाले. तेही शाळेत न जाता, फक्त परीक्षेपुरते शाळेत जायचे. गाइड पाहून पेपरावर चार रेघोट्या मारल्या की पास! त्या उन्हाळ्यात ती शहाणी झाली आणि बापाने कळम जवळच्या झाकोळ्यातल्या तानाजी लगड बरोबर लग्न लावलं. तानाजीला दोन एकर शेत होतं. पण कोरडवाहू आषाढ श्रावणातल्या पावसावर तीळ, उडीद, मूग, पिवळी ज्वार असे पीक बरे येई. तो सहावीतूनच घरी बसला होता. सुशी वयात येऊ लागली तसा रंगरूपाला उजाळा येऊ लागला. पंधरा वर्षांची झाली तेव्हा पहिलं लेकरू आलं.
 "उगा अंगठ्याएवढा वळवळता जीव. चार दोन तास काढले बिचाऱ्याने. सूर्व्य पहाया अगुदरच डोळे मिटले. जीव मातीत गाडला. दर दीड वर्स्याला ह्ये असं व्हायचं मी बी जरा जाणती झाल्ये. चंदू झाला तवा शानीन होऊ था वरसं झालीवती. ईस वरिसांची व्हती. तवा चंद्या जलमला... नंतरची वरीस दोन वरसं बरी ग्येली. पन मग समदीच चित्तरकथा."
 सुशी थोड बोले नि मग मध्येच थांबे. डोळे संतापाने फुलणारे श्वास उफाळणारा. अशावेळी मीनू म्हणे, "येऊ मी?... उगा नको विचार करुस."
 पण मीनूच्या डोक्यात तोच विचार. समाजातले खालचे नि वरचे, जमिनीच्या पोटातले असतात तसे न दिसणारे स्तर, अर्थात अभ्यासक्रमाचा अपरिहार्य भाग म्हणून उलगडून पाहताना मीनू त्यात लोणच्याच्या फोडीसारखी मुरू लागली.
 सुशीच्या केसचा अभ्यास करताना रमण भेटला. त्याने मानसोपचारावर आधारीत कौटुंबिक सल्ला हा विषय निवडला होता. त्याचीही मदत झाली.
 "ताई येक इचारू का?" सुशीचा तेव्हाचा प्रश्न.
 "विचार की!"
४/ कथाली