पान:ओळख (Olakh).pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तर सरळ नाट्यशास्त्रातून येणारी आहे. कारण नाट्यशास्त्रातच शंगार हा उत्तम गुणप्रकृती असा सांगितलेला आहे. संस्कृत वाङमयाची ही परंपरा आहे की देव, राजे, मंत्री आणि व्यापारी यांचीच प्रेमप्रकरणे रंगवायची. क्वचित प्रसंगी ऋषींचा शंगार उल्लेखिला जातो. पण सर्वसामान्य माणसे आणि दरिद्रीजन यांचा शृंगार ललित वाङमयाचा विषय नसतो. विषम समाजरचनेत निर्माण झालेला हा वाङमयीन संकेत आहे. हा संकेत तत्त्वविवेचनात अधम प्रकृतीच्या ठिकाणी स्थायीभाव नसतो म्हणजेच रतीच नसते. कारण विभाव नसतात म्हणजे उद्यान, शृंगारसाधने, एकान्त, पुष्पमाला उपलब्ध नसतात असा येतो. बाह्य साधने नाहीत म्हणून स्थायीभाव नाहीत ही भूमिका धोक्याची तर आहेच, पण स्वतः अभिनवगुप्ताच्या विवेचनाशी विसंगत आहे. कारण अभिनवगुप्त असे मानतात की, सर्व स्थायीभाव सर्व मानवमात्राच्या ठिकाणी असतातच. एकीकडे सर्व नाट्यशास्त्र सुसंगत आहेच अशी मनातली भूमिका, दुसरीकडे सर्व अभिनवगुप्त आपल्या विवेचनात सुसंगत आहेच ही भूमिका दृढमूल झालेली असते. असा प्रकार घडला म्हणजे भाषांतरात तंतोतंतपणा येतो आणि टीपांमधील विवेचकतेचे प्रमाण कमी होते. हे मी कंगले यांचा दोष म्हणून सांगत नाही, तर त्यांनी परिश्रम घेताना नकळत संग्रहग्रंथ ही भूमिका नजरेआड केली आहे त्याचा परिणाम म्हणून सांगत आहे. हे उघडच आहे की, जे कंगले यांनी केले आहे तेही सर्वांना ऋणाईत करण्याइतके मोठे आहे; पण जे व्हायचे राहिले आहे तेही पुढच्या अभ्यासकांना लक्षात घ्यावे लागणार आहे.

 काही टीपांना याआधीच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्व असते. अभ्यासकांचा एक गट नाटयशास्त्राचे पहिले पाच अध्याय क्षेपक मानतो. सहाव्या अध्यायाचा पहिला श्लोकही क्षेपक मानतो व म्हणून भरत नाट्यशास्त्रात, वक्ता भरत आहे यालाच पुरावा शिल्लक राहात नाही असे हा गट मानतो. ६-४ या ठिकाणी भरत शद्व आलेला आहे म्हणून पहिले पाच अध्याय व सहाव्या अध्यायाचा आरंभ क्षेपक मानला तरीही या ग्रंथाचा वक्ता भरतच राहतो. हे टीपेत सांगणे आवश्यक आहे. कारण ही टीप म्हणजे म. म. काणे यांच्या एका भूमिकेचे खंडन आहे. अभिनवगुप्तांनी असा उल्लेख केला आहे की, औद्भटांचा एक आक्षेप असा आहे की नाट्यशास्त्रातील विषयांचा क्रम आणि संग्रहकारिकेतील क्रम यात फरक आहे. या मुद्यावर टीप देणे आवश्यक असते. या मुद्याचा अर्थ असा आहे की, उद्भटापूर्वीही नाटयशास्त्रात संग्रह. क्रमाने विषय नव्हते. उद्भटाचा काळ लक्षात घेता आणि नाट्यशास्त्र संग्रहाचा काळ लक्षात घेता नाट्यशास्त्राचा आज उपलब्ध होणारा अध्यायक्रम सातव्या शतकापेक्षा अधिक जना आहे याचा हा आक्षेप पुरावा आहे. के. एम. वर्मा

ओळख

८३