पान:ओळख (Olakh).pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. नाटयशास्त्राचे भाषांतर करताना आणि अभिनव भारतीचेही भाषांतर करताना हे नेहमी ध्यानात ठेवावे लागते.
 भरत हा काल्पनिक पुरुष आहे आणि नाट्यशास्त्र हा संग्रहग्रंथ आहे. हे नोंदविल्यानंतरसुद्धा अभ्यासकांना आपल्या भाषांतरात या भूमिकेशी सूसंगत राहता येत नाही. यामुळे काही कच्च्या जागा निर्माण होतात. हे असे घडण्याचे कारण नकळतपणे आपल्या मनात प्रभावी झालेली भारतीय परंपरेची भूमिका हे असते. भारतीय परंपरा असे मानते की, भरत नाट्यशास्त्र हा दैवी ज्ञान सांगणारा भरतमुनीकृत ग्रंथ आहे आणि म्हणून तो अथपासून इतिपर्यंत सुसंगत आहे. ग्रंथात विरोधांचा परिहार करून अशी संगती स्थापन करणे हेच भाष्यकारांचे काम असते. ते अभिनवगुप्तांनी अतिशय सामर्थ्याने पार पाडले आहे; पण अभिनवगुप्तांनी समर्थपणे एखादी गोष्ट पार पाडणे निराळे आणि मूळ ग्रंथातच सुसंगती असणे निराळे. नाट्यशास्त्रात या घटनेची अनेक उदाहरणे सापडतात. उदाहणार्थ, एकीकडे रौद्ररसाचा स्थायीभाव सहाव्या अध्यायात क्रोध असा सांगितलेला आहे. राक्षस, दानव आणि उद्धत पुरुष या स्थायीभावाच्या मुळाशी असतात आणि हा रस युद्धाला कारण होणारा असतो. या भूमिकेला अनुसरूनच पुढे सहाव्या अध्यायात विभाव आणि अनुभाव नोंदवलेले आहेत. सातव्या अध्यायात मात्र क्रोध या स्थायीभावाचे वर्णन करताना गुरुजनांविषयी क्रोध, प्रेयसीवरील क्रोध, नोकरचाकरांवरील क्रोध, खोटा क्रोध असे क्रोधाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. विशेषतः प्रणयात असणारा क्रोध हा रौद्ररसात जाईल की शृंगारात जाईल हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे. असल्या प्रकारचे फरक नाटयशास्त्रात ठिकठिकाणी आहेत. संस्कृतमधील सर्वांत प्रसिद्ध रस शंगार जरी घेतला तरी या शृंगाराच्या बाबत असे दिसते की, अनुवंशश्लोक आणि आर्या यांच्यांत फक्त संभोग शृंगाराचाच उल्लेख आहे. विप्रलंभ शंगाराला अनुवंशश्लोकात परंपरा दिसत नाही. द्या ज्या थोड्या थोड्या फरकाच्या भूमिका नाट्यशास्त्रात आहेत त्यावर भाषांतरकाराने प्रकाश टाकावा अशी अपेक्षा असते. कंगले यांनी नाट्यशास्त्रातील श्लोकांचे अतिशय चांगले भाषांतर केले आहे. अभिनव भारतीचेही चांगले भाषांतर केले आहे. पण अशा छटांचे भेद उकलन दाखविणान्या टीपा किंवा छटाभेद लक्षात ठेवन केलेले भाषांतर त्यांच्या ग्रंथात दिसत नाही.

 अभिनव भारतीतसुद्धा अशा जागा पुष्कळ आहेत. अभिनव गुप्तांनी असा उल्लेख केला आहे की, अधम प्रकृतीच्या मनुष्याच्या ठिकाणी स्थायीभावाचा अभाव असतो. स्थायीभावाचा अभाव-विभाव सामुग्रीच्या अपूर्णत्वामुळे होतो. (पृ. २५८, रसभाव विचार ). आता ही भूमिका एका दृष्टीने पाहिले

ओळख

८२