पान:ओळख (Olakh).pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शास्त्राच्या अध्ययनाच्या ज्या सोयी उपलब्ध आहेत त्यात एक मूल्यवान भर पडली आहे. ही गोष्ट कृतज्ञतापूर्वक नमूद करणे भाग आहे.
  भरत नाट्यशास्त्र या ग्रंथाचा काळ कोणता, इथूनच वादाला आरंभ होतो. कारण या ग्रंथाचा काळ ठरविणे सोपे नाही. या ग्रंथाकडे कोणत्या पद्धतीने पाहायचे यावर या ग्रंथाचा काळ ठरविणे पुष्कळसे अवलंबून असते. भरत नावाच्या कुण्या ऐतिहासिक व्यक्तीने लिहिलेला हा ग्रंथ नव्हे. भारतीय परंपरेत काही स्वर्गीय काल्पनिक पुरुष आहेत. हे स्वर्गीय काल्पनिक पुरुष निरनिराळया ग्रंथांचे लेखक मानले जातात. शिल्पशास्त्रात विश्वकर्मा असा आहे. या विश्वकर्म्याच्या नावावर अनेक ग्रंथ टाकले गेलेले आहेत. भरत आणि कोहल हेही असेच पौराणिक पुरुष आहेत. नाटयशास्त्रातच असे म्हटले आहे की, भरत स्वर्गात राहात असे. तो पृथ्वीवर कधी आलाच नाही. स्वर्गात भरतमुनींना नाटयवेद ब्रह्मदेवाने दिला. हा नाट्यवेद शापित भरतपुत्रांनी पृथ्वीवर आणलेला आहे. सर्व नाट्यशास्त्राची रचना स्वर्गात भरत आणि अत्रीप्रभृति ऋषी यांच्यात चालल्या संवादाची आहे. हे उघडच आहे की, भरत ही कुणी ऐतिहासिक व्यक्ती नव्हे. म्हणून भरताचा काळ कोणता ह्या प्रश्नालाही काही अर्थ नाही. स्वर्गातील भरत कदाचित आजही जिवंत असण्याचा संभव आहे. आपण फक्त भरतनाट्यशास्त्र या आपणासमोर असणान्या ग्रंथाचा काळ ठरवू शकतो. हा काळ काणे यांनी इ. सनाचे तिसरे शतक असा ठरविला आहे. मनमोहन घोषांनी हा काळ सुमारे इ. स. पू. १०० इ. सनोत्तर २०० असा ठरविला आहे. काही अपवाद वजा जाता सर्वांनीच नाट्यशास्त्र हा गंथ इ. स. च्या दुसऱ्या तिसऱ्या शतकातील आहे या भूमिकेला अनुकूल कील दिलेला आहे.

 पण नाटयशास्त्राचा काळ ठरला तरी त्यामुळं एक महत्त्वाचा मुद्दा नेमका लक्षात येईलच असे नाही. हा ग्रंथ भरत नावाच्या कुणा ऐतिहासिक व्यक्तीचा नव्हे या भूमिकेचा अर्थ असा आहे की, इ. स. च्या दुसन्या-तिसच्या शतकांत कुणीतरी सिद्ध केलेला नाटय, नृत्य, काव्य, संगीत इत्यादी माहिती एकत्रित करणारा भरताच्या नावे टाकलेला हा एक संग्रहग्रंथ आहे. सर्व उपलब्ध माहिती या संग्रहात एका सैल योजनेत एकत्रित करण्यात आलेली आहे. ही माहिती अनेक ठिकाणांहून एकत्रित केलेली असल्यामुळे स्थूलमानाने एका संस्कृतीची म्हणून परस्पर सुसंगत असली तरी सूक्ष्म तपशिलावर तिच्यात विसंवाद आहेत. सक्तीने सर्व नाट्यशास्त्रातील सर्व शब्दांचा समन्वय लावण्यापेक्षा या वेगवेगळ्या छटा नीट तपासून नाटयशास्त्राच्या काळातील भिन्नभिन्न विचार आणि त्या जगातील विचारांची अवस्था व समृद्धी समजून घेणे हे महत्त्वाचे

ओळख -६

८१