पान:ओळख (Olakh).pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

की, या पुस्तकाचे मी परीक्षण करावे तेव्हा मलाच स्वतःला संकोच वाटला. कंगले यांच्यासारख्या अधिकारी अभ्यासकाविषयी त्यांचे पुस्तक सामान्य आहे इतकेच लिहून आपण थांबणे योग्य नाही असे मला वाटले. म्हणून मीच संपादकांना असे सुचविले की प्राचीन काव्यशास्त्र' या पुस्तकाचे परीक्षण — रसभाव विचार'२ या ग्रंथासहित मी करतो. कित्येक वेळेला एखादा मोठा लेखक कुठल्या तरी कल्पनेच्या आहारी जातो. आणि मग सुमार गणवत्तेचे लिखाण करतो. हा प्रकार फार तर क्षम्य म्हणता येईल. असे 'प्राचीन काव्यशास्त्र' या पुस्तकाचे झाले आहे. शे-दीडशे पानांत संपूर्ण काव्यशास्त्राचा सूक्ष्म आणि विवेचक परिचय करून देणे अशक्यच आहे. म्हणन कंगले यांनी सामान्य मराठी वाचकांना स्थलरूपात संस्कृत काव्य-शास्त्राचा परिचय करून देणे, हा आपला हेतू ठरवला आहे. असेही करायला हरकत नाही. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्थूलच पण रेखीव आणि सुबोध संस्कृत काव्यशास्त्राचा परिचय कुणी करून देणार असेल तर तीही एक स्वागतार्ह घटना आहे. कंगले यांना अशा प्रकारचा स्थूल परिचय करून देणे जमणार नाही. कारण मधूनच ते एखाद्या सूक्ष्म मुद्याला स्पर्श करतात.
 यामुळे होते काय की, सर्वसामान्य स्थल परिचय करून घेणान्यासाठी हे विवेचन असमाधानकारक होते. कारण सामान्य वाचकांना पूर्वीचे काहीच माहीत नाही असे गृहीत धरून मुळापासून विषय समजावून द्यावा लागतो. अशा विवेचनात मतांना आधार देण्यापेक्षा विवेचन सुबोध करण्यासाठी उदाहरणे भरपूर असावी लागतात. या पद्धतीने लिहिण्याची कंगले यांची प्रथा नाही. आणि जर चिकित्सक वाचकांसाठी लिहावयाचे असेल तर, हे सगळेच विवेचन त्रोटक आणि असमाधानकारक असे होते. सगळेच काव्यशास्त्र १६० पानात आटोपायचे म्हटल्यानंतर रसविचाराला २०-२५ पानांपेक्षा जास्त जागा देता येणार नाही. आणि २०-२५ पानांत भरतमुनींपासून जगन्नाथ पंडितापर्यंत सर्व रसविचार मांडायचा तर, तो चिकित्सकांना कधीच समाधानकारक वाटण्याचा संभव नाही. म्हणून विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फारसे समाधानकारक नाही, असे एक छोटेखानी पुस्तक वाचकांच्या पदरात पडते. कंगले यांच्या अधिकारज्येष्ठत्वासाठी या लिखणाचे कौतुक करणे हा एक उपचाराचा भाग म्हटला पाहिजे.
 कंगले यांची माहिती कमी आहे, या क्षेत्रातील तज्ज्ञता कमी आहे किंवा त्यांच्याजवळ खोलात शिरून विवेचन करण्याची क्षमता कमी आहे असा कोण

२. रसभावविचार : र. पं. कंगले, साहित्य संस्कृती मंडळ.
ओळख

७७