पान:ओळख (Olakh).pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
'प्राचीन काव्यशास्त्र' आणि ' रसभाव विचार'


 प्रा. कंगले हे महाराष्ट्रातील संस्कृत विद्येचे एक जाणते अभ्यासू आणि अधिकारी विद्वान लेखक आहेत. अतिशय परिश्रमपूर्वक त्यांनी सिद्ध केलेली कौटिल्य अर्थशास्त्राची चिकित्सक आवृत्ती आणि त्या आवृत्तीचे त्यांचे इंग्रजी भाषांतर हे सर्वत्र प्रमाण ठरलेले आहे. आज कंगले यांचा आधार घेतल्याशिवाय कौटिल्य अर्थशास्त्राचा विचारच करता येण कठीण झालेले आहे. त्यांचे कालिदासविषयक अध्ययनही विद्वानांच्या समोर लक्षणीय ठरलेले आहे. अशा प्रकारचा व्यासंगी लेखक आयुष्यभर प्रदीर्घ चिंतन मनन केल्यानंतर जेव्हा संस्कृत काव्यशास्त्राच्या क्षेत्रात प्रवेश करू लागतो, तेव्हा या क्षेत्रातही त्यांचे काम सर्व काव्यशास्त्राच्या अभ्यासकांना कायमचे ऋणी करील या तोलामोलाचे होऊन जाते. कंगल्यांसारख्या अभ्यासकांपासून अशीच अपेक्षा असते. सध्या ते भरतनाट्यशास्त्राकडे वळलेले आहेत. नाट्यशास्त्राचा रूपकनिरूपण करणारा १८ व १९ हा भाग त्यांनी अभिनवभारतीसहित सटीप अनुवादिला आहे, आणि आता रसभाव विचार या ग्रंथाने ते नाट्यशास्त्राचे सर्वांत महत्त्वाचे ठरलेले ६ व ७ हे दोन अध्याय अभिनवभारतीसहित भाषांतरित करून वाचकांच्या समोर ठेवीत आहेत. कंगले यांचे नाट्यशास्त्रावर चाललेले काम अतिशय मोलाचे आणि महत्त्वाचे आहे. पण हे कार्य चालू असताना मध्येच त्यांनी प्राचीन काव्यशास्त्र या नावाने एक छोटेखानी पुस्तकही प्रकाशित केले आहे.
 कंगले यांचे ' प्राचीन काव्यशास्त्र' १ हे पुस्तक फारसे चांगले नाही. अतिशय जाणत्या अशा लेखकाने एक सामान्य पुस्तक लिहावे असे 'प्राचीन काव्यशास्त्राचे ' स्वरूप आहे. म्हणून ज्यावेळी मला असे सुचविण्यात आले


१. प्राचीन काव्यशास्त्र, र. पं. कंगले, साहित्य संस्कृती मंडळ.

७६

ओळख