पान:ओळख (Olakh).pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 आमच्या लेखकांच्या मनात स्वप्नाळूपणाचा एक पदर असतो. स्वप्नाळू मनाला प्रेम ही कल्पना मोह घालणारी आहे. ययातीच्या कथेत प्रेमाला जागा कुठे आहे ? कालिदासाने ह्याबाबत मार्गदर्शन केलेले आहे. शमिष्ठा ययातीला जशी आवडती होती, तशी शकुंतले, तूही दुष्यंताला आवडती हो, असा आशीर्वाद कालिदासाने आपल्या नाटकात नोंदविलेला आहे. ह्या आशीर्वादाच्या आधारे खांडेकरांनी शर्मिष्ठा ही ययातीची प्रेयसी ठरविली. शर्मिष्ठेने राजावर प्रेम करायचे, तर ययाती आणि देवयानी ह्यांच्या मनात कुठेतरी कलह व दुरावा हवा, म्हणून मानी व अहंमन्य देवयानी ययातीशी समरस होऊ शकत नाही, असे कथानक घ्यायला हवे. राजा दुष्यंत शकुंतलेच्या प्रेमात सापडतो. ह्यापूर्वी त्याची दोन लग्ने झालेली आहेत. वसुमती आणि हंसपदिका ह्या त्याच्या राण्या मानी, भांडकुदळ व रागीट असल्याचा पुरावा नाही. राजा उदयनाला . नित्य नव्या राजकन्येच्या प्रेमात पडायाचा नाद दिसतो, पण त्याच्या आधीच्या पत्नी मानी व भांडकुदळ नाहीत. प्राचीनांच्या मते राजाने नवनव्या प्रेमात पडण्यासाठी नवी मुलगी तरुण व देखणी असणे पुरेसे होते, कारण पुरुपाला एकाधिक स्त्रिया विहित होत्या. नव्या स्त्रीच्या प्रेमात पडण्यासाठी जुन्या पत्नीशी बिनसण्याचे काही कारण जुन्या मंडळींना आवश्यक वाटत नव्हते. कृष्णाने पुनः पुन्हा नव्या राण्यांचा स्वीकार करावा, ह्यासाठी रुक्मिणीच्या बरोबर त्याचे भांडण असण्याची काही गरज नाही. शर्मिष्ठेच्या प्रेमात सापडण्यासाठी देवयानीशी राजाचा संघर्ष दाखविण्याची गरज फक्त आधुनिकांना वाटते. कारण प्रेमाच्या कल्पनेत एकनिष्ठा अपरिहार्य आहे, असे आधुनिकांना वाटते.

 एक प्रश्न शिल्लकच राहतो. देवयानीला ययातीशी समरस होऊन संसार करणे का जम नये? तरुण प्रौढ वयात ययातीशी लग्न करण्याचा निर्णय देवयानीने स्वतः घेतलेला होता. स्वतः घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी देवयानीला पार का पाडता येऊ नये? ययातीशी समरस होण्याची धडपड देवयानीने का करू नये ? ह्या ठिकाणी आमच्या लेखकांना इब्सेनची हेडागॅब्लर उपयोगी दिसते. प्रियकर आणि पती ह्यांच्या परस्पर विरोधी निष्ठांमध्ये हेडागॅब्लर फाटलेली आहे. देवयानीचे प्रेम कचावर आहे. तिच्या मनाचे आधीच समर्पण झालेले आहे. म्हणन देवयानी ययातीशी समरस होऊ शकत नाही. खरे प्रेम माणस एकदाच करू शकतो. शर्मिष्ठेने असे प्रेम ययातीवर केले आहे. देवयानीने प्रेम कचावर केले आहे. म्हणून आधुनिकांच्या मते ययाती, देवयानी, मिष्ठा आणि कच असा एक चौकोन आहे. ह्या चौकोनात आपल्या प्रेमाला उदात्ततेचे अधिष्ठान देणारा कच व निष्कामतेचे अधिष्ठान देणारी शमिष्ठा ही एक वाज, आणि आपल्या प्रेमाला पार्थीव आकार देण्यासाठी झटणारा ययाती

ओळख

२३