पान:ओळख (Olakh).pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महत्त्वाचे मानतात. म्हणून समाजवादी समाजरचनेचा मध्यवर्ती मुद्दा संयम हा असतो. क्षमता असेल तितके श्रम व गरज भागेल तितकी कमाई. ह्या सूत्राची नैतिक पातळी संयमाची आहे.
 मुक्त स्वातंत्र्य हा भांडवलशाहीचा जयघोष असतो. व्यवहार ह्याचा अर्थ जमेल त्याने शक्य ते सावडावे व आपली मालकी ठेवून भोग घ्यावा असा होतो. बलवंताच्या भोगवादाचेच गोंडस नाव मुक्त स्वातंत्र्य असते. त्याग वैराग्य हा धर्म परंपरेचा जयघोष असतो. व्यवहारात त्याचा अर्थ नसणान्याने गप्प बसावे, मिळविण्याचा खोटा उद्योग करू नये असा होतो. बलवंताच्या भोगवादाचे संरक्षक कवच म्हणन हे तत्त्वज्ञान राबविले जात असते. गलामांचे मनही गुलाम करण्याचा हा मार्ग मोठा मोहक दिसणारा असा आहे. संयम हा समाजवादाचा जयघोष असतो. गरजा अफाट वाढणाऱ्या असतात. साधने मर्यादित व अपुरी असतात. अशा वेळी सर्वांना न्याय्य वाटा मिळायचा असेल तर संयमाविना मार्ग नसतो. प्रकृती सत्य मानणारे अन्न व काम सत्य मानणारे पण प्रकृतीची व्यवस्था लावून माणूस मुक्त करू इच्छिणारे संयमाचेच पाईक असतात. प्रकृती सत्य आहेच पण तिच्या पायावर उभी असणारी संस्कृतीही सत्य आहे. प्रकृती म्हणजे अस्तित्व पण संस्कृती म्हणजे अस्तित्वाचा अर्थ. असे द्वंद्वात्मक भान असणान्यांचे नैतिक तत्त्वज्ञान संयम असते. एकाचे स्वातंत्र्य हा जर इतर सर्वांच्या दास्याचा जाहीरनामा व्हायला नको असेल तर मग स्वातंत्र्याचा उदय व्यक्तीच्या भोगेच्छेतून न झाला पाहिजे. सर्वांच्या स्वातंत्र्याशी सुसंगत असणाऱ्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यभावनेचा उदय सर्वांविषयी असणान्या आत्मभावातून व स्वतःच्या संयमाच्या जाणिवेतून होत असतो. इतरांच्या हक्काच्या जाणिवेचेच एक रूप संयम हे असते. ज्यांना समाजवादातील नैतिक आशय तीव्रपणे जाणवला त्यांच्यावर गांधीजीचा प्रभाव पडणेच भाग असते. कारण गांधीजी वैज्ञानिक समाजवादी नसतील पण ते वर्तमान युगात भारतीयांच्या परंपरासमद्ध नैतिक जाणिवेचे महान वारसदार होते. कच हा असा समाजवादाने प्रभावित गांधीवादी आहे. सानेगुरुजींचा आस्तिकही असाच होता.

 खांडेकरांची 'ययाती' ही अशी आधुनिक माणसाच्या नव्या आकांक्षाची कथा आहे. ती महाभारतातील ययातीची कथा नव्हे. अगर परंपरेची पुराणकथाही नव्हे.

ओळख

१८