पान:ओळख (Olakh).pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



दुर्दैवी ययाती

 भाऊसाहेब खांडेकरांची ययाती ही एक यशस्वी कादंबरी आहे. स्वतः खाडकर मराठीतील लोकप्रिय कादंबरीकार; पण त्यांच्या नित्याच्या यशाला फिके करील असे उज्ज्वल यश ययातीने मिळविले. दुसन्या महायुद्धानंतर मराठीत लिहिलेल्या कादंबऱ्यांमध्ये खपाच्या दृष्टीने उच्चांक ययातीचा. यंदा तर भारतीय ज्ञानपीठाने ह्या कादंबरीला पारितोषिक दिल्यामुळे तिच्या यशावर भव्य कळस चढवला गेला. मराठी भाषेच्या गौरवातही भर पडली. तेव्हा प्रथम हे लक्षात घ्यायला हवे की, ज्यावेळी मी ययातीला दुर्दैवी म्हणतो त्यावेळी मला ही अतिशय भाग्यवान कादंबरी दुर्दैवी आहे असे म्हणावयाचे नाही. मला राजा ययाती दुर्दैवी आहे असे म्हणावयाचे आहे.
 खरे म्हणजे ययाती दुर्दैवी नाही. ज्या प्रकारचे जीवन ययाती जगला, त्यात इतर कुणी दया करावी, अनुकंपा दाखवावी, असे काहीही नाही. खरे दुर्दैव ययातीच्या जीवनात नाही. दुर्दैव असेल तर ज्या पद्धतीने भारतीयांच्या स्मरणात ययाती स्थिरावला आहे. ते तुमचे आमचे सांस्कृतिक स्मरण. हे ययातीचे खरे दुर्दैव आहे. कारण आपण ययातीकडे भोगाचा प्रतिनिधी म्हणून पाहातो. ज्याचे सर्व लगाम सैल झालेले आहेत आणि आवरण्यासाठी ज्याच्या पाठीवर स्वारच नाहीत अशा बेभान धुंद अवस्थेत स्वैर उधळलेल्या घोड्याच्या रूपाने आपण ययातीला पाहतो. उपनिषदांत असे म्हटले आहे की शरीर हे रथ असून इंद्रिये ही ह्या रथाला जोडलेल्या घोड्यांसारखी आहेत. आत्मा ह्या रथात बसणारा रथी आहे. त्यामुळे इंद्रियांना स्वतःच्या ताब्यात ठेवण्याऐवजी बलवान इंद्रियांच्या आहारी जाणाऱ्या माणसाचे प्रतीक, हा स्वैर अश्व अगदी उचित आहे. ययातीचा प्रतिनिधी घोडा आणि ययातीच्या जीवनाचा आशय भोग, अशी संगती आपल्या मनात फार बलवान व दृढ आहे.

ओळख

१९