भाऊसाहेबांना महाभारतातील हा ययाती उपयोगाचा नाही. त्यांना भोगलंपट ययाती हवा. महाभारतात तो तसा नसेल तर भाऊ कल्पनेतून भोगशरण ययाती निर्माण करतील. पण भाऊंना ह्यासाठी परंपरेचा आधारच आहे. महाभारतातील ययातीची कथा कशीही असो माझा भोग अतप्त आहे असे म्हणून पुत्रांचे तारुण्य स्वतःसाठी घेणारा ययाती भारतीय लोकमानसात लंपटांचा प्रतिनिधीच राहिला. पद्मपुराणात ययातीची एक कथा आली आहे ही कथा क्षेपक आहे. जराग्रस्त ययातीच्या वासना अजून ताज्या होत्या. त्याला देखण्या अश्रूबिदूमतीबरोबर विवाह करावयाचा आहे. म्हणून ययाती पुत्रांना तारुण्य मागतो अशी ही कथा आहे. आपण पद्मपुराणाची कथा उत्तरकालीन व बनावट म्हणू शकतो. ती बनावट आहेही. पण ह्यामुळे सिद्ध काय होते ? ययातीकडे भारतीय मन गेली सात आठशे वर्षे भोगलंपट म्हणनच पाहात आले. इतकेच ह्या बनावट कथा सिद्ध करतात. म्हातारपणी नव्या बाईसाठी झुरणारा व तिच्या प्राप्तीची किंमत म्हणून पुत्रावर ब्रह्मचर्य लादणारा शंतनू, म्हातारपणी पत्निमोहात, पुत्राला वनवासी करणारा दशरथं हे लंपट राजे मागे पडले आणि ययाती मात्र भोगासक्तीचा प्रतिनिधी ठरला. भारतीय लोकमानसांतील लंपट ययाती खांडेकरांनी स्वीकारलेला आहे. लंपटाचा भित्रेपणा, अनावर वासना, त्याच्या मनाचा अश्रद्ध अस्थिरपणा भाऊंनी ययातीत एकत्र करून त्यानुसार त्याचे सर्व जीवन रंगविण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याच ध्येयवादावर उत्कट श्रद्धा नसल्यामुळे स्वतःच्या ठिकाणी असणान्या जन्मसिद्ध पशुत्वातच स्वतःचे दु:ख व एकाकीपणा हरवू पाहणान्या व पशुत्वाच्या प्रदर्शनात समर्थनात स्वतःच्या जीवनाची सार्थकता शोधू पाहणा-या पिढीचा ययाती प्रतिनिधी आहेच पण तो अधिक काही आहे. बंधने नको असणाऱ्या अनिबंध स्वातंत्र्याच्या दायित्वशन्य तत्त्वज्ञानाचाही ययाती प्रतिनिधी आहे.
प्राचीन धर्मपरंपरा वैराग्याला सत्य मानणारी आहे. अद्वैत तत्त्वज्ञानानुसार फक्त ब्रह्म तेवढे सत्य असून बाकी सगळे जग मिथ्या आहे. देह हा ह्या खोट्या जगाचा भाग आहे. देह असल्यामुळे इंद्रिये, इंद्रियांचे विषय व वासना आहेत. हा सगळाच मिथ्या जगाचा पसारा आहे. ह्या सर्व नामरूप असणा-या, इंद्रियांच्या प्रत्ययाला येणाऱ्या जगाचे खोटेपण आणि ब्रह्म व आत्मा ह्यांचे अद्वैत हा या दर्शनाचा गाभाच आहे. खरोखरी नसणारी पण अज्ञानामुळे जाणवणारी ही प्रकृती व तिचा मायिक प्रपंच आत्मवाद्यांसाठी एक महान · अवस्तू ' असते. अद्वैतापेक्षा द्वैताची परिभाषा व मांडणी निराळी येईल. पण निष्कर्ष निराळा नसतो. म्हणन धर्म परंपरेने भोग विरुद्ध त्याग असा संघर्ष असतो. धर्म परंपरेनसार भोगाची व्यर्थता पटली म्हणजे वैराग्याचा उदय
.
१३