पान:ओळख (Olakh).pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



होतो. वैराग्य स्थिरावले म्हणजे मिथ्या प्रपंचाचा त्याग व निरास होतो. ह्यानंतर मोक्ष सिद्ध होतो. इहपरलोकीच्या भोगाविषयी वैराग्य हा शंकराचार्यांनी ब्रह्म जिज्ञासेचा आरंभ मानला आहे तो ह्यामुळेच. परंपरावाद्यांसाठी ययाती मिथ्या भोगात असक्त होण्याचे उदाहरण होता. असा भोग व्यर्थच असतो. ययातीला सुद्धा भोगाची व्यर्थता पटताच वैराग्य ग्रहण करून तो वनात जातो. खांडेकरांना लंपट ययाती हवा आहे. पण त्यांना परंपरावादी स्पष्टीकरण मात्र मान्य नाही.
 खांडेकरांचे आधुनिक मन हे फ्राईड-मार्क्स आणि गांधी ह्या त्रिमर्तीने, प्रभावित झालेले असे समाजवादी मन आहे. मार्क्सवाद्यांना फ्राईड आवडत नसेल. व फ्राईडवाद्यांना माक्स आवडत नसेल. ह्या दोन्ही गटांना गांधीजीविषयी तुच्छता वाटत असेल. पण खांडेकर मात्र तिघांनाही सत्य मानणारे आहेत. व्यापक अर्थाने तिघांच्याही भूमिका परस्पर सुसंगतच आहेत असे त्यांना वाटते. खांडेकरांच्या पद्धतीने सांगायचे झाले तर मार्क्स अन्यक्षुधेची मूलभूतता सांगतो. फ्राईड कामवासनेची मूलभूतता व तिची प्रबळता सांगतो. दोघे मिळून प्रकृती हे एक न नाकारता येणारे सत्य आहे असे सांगतात. ह्या प्रकृतीची व्यवस्था लावूनच संस्कृतीचे महाल सजविता येत असतात. फ्राईड आणि मार्क्स दोघे मिळून माणसातील पशूचे अजस्र बळ सांगत असतात. गांधी हा संस्कृतीचा प्रतिनिधी आहे. खांडेकरांसाठी प्रकृती हे न नाकारता येणारे सत्य आहे. कारण भाऊ मलतः जडवादी आहेत. त्यांना भोगाची व्यर्थता मान्य आहे. पण भोग व्यर्थ आहे, म्हणून त्यागाच्या आश्रयाला जा हे सुत्र अमान्य आहे. भोग विरुद्ध त्याग अशी मांडणी करून जगाला नित्य त्यागाचा संदेश देणान्या समाजरचना अतिशय चतुरपणे कुणाच्यातरी भोगाचे रक्षण करीत असतात. म्हणून त्यांना ययातीच्या कथेत वैराग्याच्या तत्त्वज्ञानाची व्यर्थता आवश्यकच वाटत होती. महाभारतातील एका प्रक्षेपाचा मात्र त्यांना आधार होता.

 शंतनू चा एक वडील भाऊ देवापी होता. त्याने तरुण वयातच राज्यत्याग केला व तो ऋषी झाला. ह्या देवापीचा उल्लेख वेदात आहे. महाभारतात असे म्हटले आहे की ययातीला एक वडील भाऊ यती होता. कुणी तरी प्रक्षेप वाढविला आहे. यतीने राज्यत्याग केला व तो मनी झाला. धर्मग्रंथ व परंपरा देवापी आणि यती ह्यांच्या जीवनाचे सार्थक झाले असे मानते. खांडेकरांना यतीचे आयष्य विफल व व्यर्थ झाले असे दाखवायचे आहे. त्यासाठीच ते यतीच्या कथेचा कल्पनेने विस्तार करतात. स्वतःच्या मनाला खांडेकरांनी विचारले असेल की जे इहलौकिक दायित्वाचा त्याग करून मोक्ष साधनेसाठी वनात जातात, जे सारे जगच नाकारतात ह्यांच्या जीवनाचा अर्थ काय ?

ओळख

१४