पान:ओळख (Olakh).pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यांच्या ग्रंथाचे स्वरूप नाही हे स्पष्ट व्हावे. दुर्गाबाईंच्या ग्रंथाने लोकसाहित्याच्या विवेचक अभ्यासाची एक दिशा स्पष्ट होते. तो त्या दिशेचा अत्यंत महत्त्वाचा आणि मौलिक असा प्रारंभ आहे.. मांडे यांच्या ग्रंथामुळे लोकसाहित्याच्या अभ्यासाची एक निराळीच अशी दिशा आरंभ होते, हाही महत्त्वाचा आरंभ आहे. दुर्गाबाईंच्या त्या अधिकाराला वंदन करून आणि कोणत्याही प्रकारे मांडे व दुर्गाबाई यांची तुलना करण्याचा प्रयत्न टाळून हे म्हटले पाहिजे की, ज्या पद्धतीने मांडे विचार करीत आहेत, त्या पद्धतीने विचार करणारा पहिला ग्रंथ मांडे यांचा आहे.
  मांडे यांच्या ग्रथातील मुख्य प्रमेयच हे आहे की, लोकसाहित्य त्या त्या समाजजीवनातच पाहिले पाहिजे. समाजजीवनाचा संबंध सोडून देऊन फक्त साहित्याचा सुटा अभ्यास जर आपण करू लागलो तर त्यामुळे लोकसाहित्याचे घडणारे दर्शन अपुरे राहते. आणि समाजजीवनाचा या साहित्याचा संबंध आपण तपासू लागलो तर आपल्याला वेगवेगळ्या विधींपर्यंत जाऊन पोहोचावे लागते. लोकसाहित्याचा समाजपरंपरेतील नानाविध विधींशी असणारा घनिष्ठ संबंध आपण लक्षात घेतला तर समाजजीवनातील विविध विधी हा लोकसाहित्याचा आधार आहे, ते सामाजिक विधींशी निगडित असणारे साहित्य आहे, या निर्णयावर आपणाला यावे लागते. हे सर्व सामाजिक विधी अति प्राचीन असून मूलतः अतिप्राचीन मानवाच्या जीवनातील यातुकल्पनेशी यांचा संबंध आहे वेगवेगळया मार्गाने लोकसाहित्याच्या अभ्यासातून आपल्याला समूहमनात रुजलेल्या यातुसंबद्ध श्रद्धा व समजुतीपर्यंत जावे लागते. मांडे इतके म्हणून थांबलेले आहेत. आपल्या ग्रंथात त्यांनी लोकधर्म आणि लोकसेवा ह्यांचा जाता जाता उल्लेख केलेला आहे. पण तपशिलाने विचार केलेला नाही. मी यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊ इच्छितो.
 जर लोकसाहित्याचा समाजजीवनात लोकविधींशी संबंध आहे, हा मुद्दा आपण प्रमाण मानला तर परंपरागत समूहमनात साठलेले सर्व विधी, समजुती आणि या विधी व समजुतींच्या मूळ उगमाचा शोध हे लोकसाहित्याच्या विवेचनातील केंद्रीय स्थान होऊन जाते. वेगळ्या भाषेत सांगायचे तर आजच्या समूहमनात आदिमानवाच्या श्रद्धांचे जे अवशेष मूलस्वरूपात अगर रूपांतरित होऊन पसरलेले दिसतात, त्यांची संगती लावणे व समूहाच्या उत्क्रांतीचे आलेखन करणे हे लोकसाहित्याचे प्रमुख कार्य आहे असे म्हटले पाहिजे.

 प्रायः लोकसाहित्याचे अभ्यासक जगभर पसरलेल्या आदिमानवाच्या आणि आदिसंस्कृतीच्या मध्ये असणान्या सारखेपणाचा शोध घेत असताना दिसतात. हे तर महत्त्वाचे आहेच पण त्याबरोबर प्रत्येक ठिकाणी असणारा

ओळख

१३३