पान:ओळख (Olakh).pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शोध घेतला आहे. डॉ. मांडे लोकसाहित्य ही संज्ञा यापेक्षा व्यापक अर्थाने वापरतात. लोकमानसाचे दर्शन ज्या कोणत्या प्रकाराने आपल्याला घडते ते सर्वच प्रकार त्यांनी आपल्या डोळ्यांसमोर ठेवलेले आहेत. हे सारे प्रकार लोकमानस समजून घेण्याचे साधन म्हणून ते पाहतात. मांडे यांना ही सर्व साधने लोकसाहित्य या संज्ञेत अभिप्रेत आहेत. म्हणून साहित्याच्या बाहेर लोकनृत्य, लोकनाट्य यांच्यासह ते सगळ्याच चाली, रूढी, श्रद्धा समजुती यांचा विचार करू इच्छितात. म्हणजे मांडे यांची लोकसाहित्याची कल्पना ही अधिक व्यापक आहे आणि या व्यापक लोकसाहित्याचा एका विशिष्ट दृष्टिकोणातून ते आढावा पाहतात. या साहित्यात प्रतिबिंबित झालेले समाजमन हे तर मांडे पाहतातच पण त्याबरोबर ज्या समाजजीवनात हे लोकसाहित्य उदयाला आलेले आहे त्या समाजजीवनाशीसुद्धा या साहित्याचा संबंध काय हे मांडे पाहू इच्छितात.
 लोकसाहित्यात प्रतिबिंबित झालेले सामाजिक मन पाहणे ही एक भिन्न प्रक्रिया आहे आणि तिचा विवेचनात्मक अभ्यासाशी संबंध आहेच. पण समाजजीवनाशी या साहित्याचा संबंध तपासून पाहणे ही यापेक्षा भिन्न प्रक्रिया आहे. ती विवेचकतेसाठी एक नवे दालन उघडणारी बाब आहे. या दोन्हींमध्ये नेमका फरक ओळखणे महत्त्वाचे आहे. ह्या दोन्ही बाबी जणू काही एकच आहेत असे वाटण्याचा संभव आहे. “ सरले दळण । सरले म्हणू नये । भरले घर सये। माझ्या राजसाचे ॥" ही ओवी जर घेतली तर भरलेल्या घरात दळण दळणाऱ्या स्त्रीने दळण सरले असे म्हणू नये, हा सामाजिक संकेत त्यात दिसतो. भरलेल्या घरात कोणते उल्लेख शुभ आणि अशुभ मानले जातात याबाबतच्या काही समजुती आहेत. त्यातील हा एक संकेत आहे. लोकसाहित्यात प्रतिबिंबित झालेल्या समूहमनाचा शोध ह्या पद्धतीने घेतला जातो. पण सकाळी उठन दळण दळण्याची प्रथा असे. हे दळण स्त्रियाच दळीत. स्त्रियांनी दळण दळणे ही गोष्ट नांदत्या घरात आवश्यक मानली जाई. सौभाग्यवती स्त्रियांनी दळण दळणे हे मंगलसूचक होते. म्हणून विवाहादी समारंभापूर्वी मुद्दाम जात्याला पवते बांधून आईबाप, सासुसासरे, जिवंत असणा-या पाच सुवासिनी दळणाला आरंभ करीत असत. त्या प्रसंगी गीते गाईली जात. सुवासिनींनी जात्यावर दळताना एक तरी ओवी म्हणणे आवश्यक मानले जाई. ओवी न म्हणता दळण दळणे अशुभ समजत. हा सगळा शोध एका वेगळ्या पातळीवरचा आहे. डॉ. मांडे लोकसाहित्य ही संज्ञा अधिक व्यापक गृहीत धरतात आणि या सगळ्याच साहित्याचा समाजजीवनाशी असणारा संबंध शोधू इच्छितात.

 हे मुद्दाम सांगण्याचे कारण असे की, ज्या दिशेने दुर्गाबाई भागवत यांचे विवेचन गेलेले आहे त्या दिशेने जाणारा हा अजून एक अभ्यास आहे, असे मांडे

१३२

ओळख