पान:एक नवें तुफ़ान.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

1 कै. गोखले यांचा पक्ष होय. या पक्षास नेमस्त वर्गामध्ये एक प्रकारचें महत्व आहे व जर हा पक्ष दिल्लीकाँग्रेसने आपलासा करून घेतला असता तर बहुतेक सर्व नेमस्त पक्ष काँग्रेसचा पुरस्कर्ता आहे असें ठरून नंतर लौकरच सर्व नेमस्तपक्ष त्यानंतर काँग्रेसशी पूर्वीप्रमाणे सहकार्य करूं लागता यांत संशय नाहीं. या वेळेस ज्यांनीं एकीचें महत्व ओळखलेलें होतें अशा पुढाऱ्यांचें- मिसेस बेझंट त्यांत आग्रगण्य होत्या-जर असें म्हणणें होतें कीं, मुंबईस ज्या गोष्टी राष्ट्रीय व नेमस्त पक्षानें निश्चित केल्या आहेत त्यांत नेमस्त पक्षाच्या संमतीशिवाय फिरवाफिरव करूं नये तर त्यांत वावगें तें काय ? मुंबईची काँग्रेस सुधारणांचा विचार करण्याकरितांच म्हणून मुद्दाम भरविलेली होती. ती हजार विषयांचा विचार करणारी वार्षिक काँग्रेस नव्हती. ज्या गोष्टींकरितां म्हणून ही जादा काँग्रेस मुद्दाम भरली व ज्या गोष्टींचा तेथें मवाळजहालांनीं विशेष खल करून दोघांच्या संमतीचा म्हणून सरकारपुढे टाकण्यास एक संयुक्त खर्डा तयार केला ती गोष्ट तीन महिन्यांनी बदलून दोघां पक्षांमध्ये झालेल्या ठरावास हरताळ फासणे ही गोष्ट अयोग्य होती. त्यापासून फार तोटे झाले आहेत हें आज दिसतच आहे. मुंबईच्या काँग्रेसला जितका नेमस्तांचा पाठिंबा होता त्यांतला पुष्कळ दिल्लीनंतर कमी झाला. राष्ट्रीय पक्ष व नेमस्त पक्ष हे परस्परांस दूर झाले, व नेमस्त पक्षास आपलें डेप्युटेशन निराळें असावें अर्से वाटण्यास एक सबळ कारण मिळालें. राष्ट्रीय पक्षांतही दुही झाली. काँग्रेसच्या डेप्युटेशनवर ज्या तोलाची माणसें जावयास पाहिजेत त्यांपैकीं कांहीं जाण्यास नाकबूल झालीं व कांहींचा उत्साह थंडावला. अध्यक्ष पंडित मदन मोहन हे जाणार असें वर्तमानपत्र सांगतात; पण जातील तेव्हां खरें. आज देशांत सर्वत्र दुही आहे व त्याचें मूल कारण दिल्लीच्या काँग्रेसमध्ये आहे, हे कोणाही चाणाक्ष माणसास समजेल. ही दुही पुढे देशास न जाचो म्हणजे मिळविली. बरें ही दुही करून मिळविलें काय ? तर मुख्यतः प्रांतिक स्वराज्य तात्काळ मागण्याचा ठराव. एकंदर सर्व स्वराज्य पंधरा वर्षांत काँग्रेसला पाहिजे आहे. त्यांतलें प्रांतिक स्वराज्य सहा वर्षांनी हवें असें काँग्रेस म्हणत होती. ती सहा वर्षांची गोष्ट आज हवी या मागणीकरितां एकी मोडणें म्हणजे कालि- दास म्हणतो त्याप्रमाणे- , अल्पस्य हेतोर्बहु हातुम् इच्छन् 6 असें करणें होय.