पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/89

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वारसाहक्काची बोळवण 'माहेरची साडी' देऊन करण्याचे दिवस संपत असल्याची उदाहरणे घरोघरी पाहावयास मिळत आहेत. पैत्रुक संपत्तीतील स्त्री धनावर असलेला 'पुरुषी एकाधिकार' संपत आला नसला तरी त्याचा कासरा-‘ढिला' पडतो आहे, हे मात्र निश्चित.
 खान-पान, रोटी-बेटी व्यवहार, सांस्कृतिक सण-समारंभ यातही महाराष्ट्रात मोठे बदल होत आहेत. घरी-दारी, अंगणात, आवारात लग्न लावण्यापेक्षा कार्यालयात लग्न करण्याकडे कल वाढतो आहे. ते प्रतिष्ठा, श्रीमंती व प्रागतिकतेचे लक्षण ठरत आहे. लग्न व्यवहार, कुल, गोत्र, पदर लागणे यापेक्षा आर्थिक स्थिती, नोकरी शाश्वती, मिळवतेपण, सुशिक्षितता यांचे मूल्य वाढत आहे. जातीय भिंतीचा अभेद्यपणा, पोटजातीय विवाहसंबंध स्वीकारण्याच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे फोल ठरतो आहे. बाहेर जेवणाचे व जेवणावळीचे प्रमाण वाढत आहे. स्वतःची मोटार हे महाराष्ट्राच्या नव्या आर्थिक क्रांतीचे निदर्शक ठरेल. नॅनो कुठे पार्क करणार असा प्रश्न आहे. एकतर घरात पार्किंगची सोय नाही. रस्ते अरुंद, रिकामी जागा, मैदाने, मोठ्या रस्त्यांच्या दुतर्फा वाहने लागतील. हे नवे सामाजिक अरिष्ट ठरेल. आज दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगलोर, कलकत्ता या शहरात मोटर मालकांना आपल्या किल्ल्या पार्किंग रक्षकांकडे अशासाठी सुपूर्द कराव्या लागतात की एकापुढे एक पार्किंग केले नाही तर पाच किलोमीटर दूर पार्किंग करावे लागते आहे. खेड्यातील दरडोई वाहनांचे वाढते प्रमाण महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचे निदर्शक होय. सांस्कृतिक सण समारंभात नाचगाणी, दंगा-धुडगूस, मद्यपान इ. मुळे ओंगळ रूप येत आहे. त्यांचे संस्कार नि सांस्कृतिक मूल्य कमी होऊन ते हैदोसाचे माध्यम होत आहे. यात त्वरित हस्तक्षेपाची गरज आहे. विवाहातील वाढता स्वैरपणा, समारंभाचे उत्सवी स्वरूप, पद्धती याबद्दल ज्येष्ठ पिढीने हस्तक्षेप न केल्यास सण, समारंभ यांचे गांभीर्य समूळ नष्ट होण्याची साधार भीती वाटते.
 विवाहपूर्व पातळीवर व विवाहोत्तर काळात बाह्य शरीर संबंधांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. लॉजची वाढती मागणी व विस्तारांचा अभ्यास केला की हे लगेच लक्षात येईल. तसेच संतती नियंत्रक साधनांचा विवाहपूर्व व विवाहोत्तर बाह्य संबंधात किती वापर होतो, याचा अभ्यास करताही ते सहज कळून येईल अशी स्थिती आहे.

 घरी-दारी वाढता चंगळवाद, भौतिक संपन्नता एकीकडे व दुसरीकडे दोन वेळची भाकरी मिळणे दुरापास्त होणे ही विषम समाजस्थिती हे महाराष्ट्राच्या बदलापुढील उद्याचे मोठे आव्हान आहे. सामाजिक, धार्मिक, आर्थिक,

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/८८