पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/88

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दिसत असली तरी व्यक्ती व कुटुंब पातळीवर आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहाचे प्रमाण वाढते आहे. शिक्षित युवकांत स्थलांतर, देशांतर, पर्यटनाची वाढती प्रवृत्ती आहे. त्यामुळे जात, धर्म या पातळीवर नवशिक्षित व नवश्रीमंत वर्ग जात, धर्मापालीकडे जाऊन मानवधर्मी होतो आहे. ग्रामीण समाजाच्या तुलनेने शहरी भागात याचे वाढते प्रमाण पाहताक्षणी लक्षात येते. शहरी भागात तर Live in relationship म्हणजे लग्नाशिवाय लग्नासारखे राहण्याचे प्रमाण वाढत आहे. प्रेमविवाह वाढत आहेत. मुलींचे विवाह विरोधाचे प्रमाणही वाढते आहे. सध्या ही ‘शांत क्रांती' जरी असली, तरी पुढील काळात त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसून येतील.
 राज्यकर्त्यांबद्दलची वाढती नाराजी भविष्यकाळात उत्स्फूर्त स्वतंत्र संघटनांकडे आगेकूच करते आहे. अलीकडेच मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निमित्ताने सर्वत्र झालेली निदर्शने पक्षापेक्षा स्वयंस्फूर्त संघटनांची होती. त्याला नेतृत्व नव्हते हे लक्षात घेण्यासारखे आहे. येथून पुढच्या काळात वाढती जनजागृती पैशाच्या जोरावर राजसत्ता हस्तगत करण्याचा हकमी डाव हाणून पाडेल, अशी राजकीय जागृती इथे रुजते आहे. शेतकरी संघटनांचा वाढता प्रभाव व शहरी भागात युवक संघटनांची वाढती भागिदारी ही नव्या बदलाची नांदी होय.
 स्त्री-पुरुष तुलनेच्या दृष्टीने पाहू जाता जनसंख्येच्या पातळीत स्त्री प्रमाण घटते आहे, ही चिंतेची बाब आहे. पण स्त्री विकासाच्या वाढत्या पाऊलखुणांची नोंद समाजाने ज्या गांभीर्याने घ्यायला हवी ती घेतली जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे वाढते प्रमाण आश्वासक आहे. मिळवत्या स्त्रियांचे प्रमाण खेड्यात नि शहरात वाढते आहे. पैसा हातात येणे व खर्चाचा अधिकार मिळणे, या दोन्ही पातळीवरील महिलांची आघाडी नव्या बदलाची नोंद करत आहे. खेड्यात कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय यातून स्त्रियांच्या हातात पैसा केंद्रित होतो आहे. ग्रामस्वराज्य पातळीवरील महिला आरक्षणामुळे स्त्री अस्मितेने चांगले मूळ धरले आहे. शहरात महिलांचे नोकरीचे प्रमाण सर्वच स्तरावर वाढते आहे. कौटुंबिक पातळीवरही ‘निर्णयाचा काटा' पुरुषाकडून स्त्रीकडे सरकत आहे. बिग बझार, मॉल्स, दुकाने इ. ठिकाणी होणारी खरेदी, तिचा निर्णय यांचे सर्वेक्षणाचे

आकडे महाराष्ट्रात महिला सत्ता’ येते आहे, याची निदर्शक आहे. सावित्रीबाईंचे इथले राज्य केरळच्या पावलावर पाऊल टाकत आहे. शाळा, कॉलेजात गुणवत्तेच्या पातळीवर दिसून येणारा स्त्री विकास समाजशास्त्रीय अभ्यासाचा विषय ठरावा, इतका गतिमान आहे नि ही अभिनंदनीय गोष्ट ठरावी.

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/८७