पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/90

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सांस्कृतिक व राजकीय विषमतेच्या पातळीवर आपण गंभीर नाही आहोत. विना अनुदान शिक्षण व्यवस्थेने शिक्षणाचा एकाधिकार पैसेवाल्यांच्या हाती सोपवल्यामुळे मासिक ५ रुपयात मिळणारे बालवाडी, माँटेसरीचे शिक्षण मासिक ५०० ते ५००० रुपयांच्या घरात गेले आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत असल्याने शिक्षण प्रसार होतो आहे, असा समज दूरवर पसरत असला तरी उच्च शिक्षण ही केवळ पैसेवाल्यांची मिरासदारी झाली आहे. हे बहुजन समाजास ज्या क्षणी लक्षात येईल त्या क्षणी या संस्था जनक्षोभाचे लक्ष्य ठरतील. अलीकडे भारती विद्यापीठावर मनसेने केलेला हल्ला ही त्याचीच चुणूक होय. सर्व शिक्षणसंस्था या सत्ताधारी व राजकारणी व्यक्तींचे त्यांच्या राजकारण व उपजीविकेचे साधन म्हणून विकसित होत आहेत, ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही. इंग्रजी शिक्षणाच्या वाढत्या संस्था हे महाराष्ट्रीय समाजाच्या नवविकासाचे, विकासाच्या नवसंकल्पनेचे प्रतीक आहे. ज्या प्रमाणात इंग्रजी प्राथमिक शाळा वाढत आहेत त्या प्रमाणात मात्र इंग्रजी माध्यमांच्या माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये वाढत नाहीत. त्यामुळे अशा इंग्रजी माध्यमातील नवशिक्षितांच्या उच्च शिक्षण प्रवेशाचा प्रश्न भविष्यकाळात गंभीर रूप धारण करील यात शंका नाही.

 ग्रामीण भागात रोजगारांची केंद्रे, एमआयडीसीज वाढत असल्या तरी ग्रामीण भागातील अल्पशिक्षित व अकुशल युवकांना रोजगाराच्या वाढत्या संधी उपलब्ध होत नाहीत. परिणामी ग्रामीण युवकात शिक्षण, रोजगाराबद्दलचे वैफल्य वाढते आहे. भविष्यकाळातील समाजकार्य व राजकारण हे युवक संघटन ज्यांच्या हाती असेल त्यांचेच असणार हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट होत आहे. विशेषतः पंचतारांकित औद्योगिक वसाहती, विशेष आर्थिक क्षेत्रातील उद्योग (सेझ) यामुळे ग्रामीण भागातील रोजगार वाढवण्याच्या नियोजनातील फोलपणा स्पष्ट होतो आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण विकासाच्या पुनर्रचनेचा व नव्या दृष्टिकोनाचा प्रश्न ऐरणीवर आला तरी त्याचे पुरेसे भान राज्यकत्र्यांना नाही. सहकारी सूतगिरण्या, साखर कारखाने, दूध उत्पादन केंद्रे यातून ग्रामीण भागातील आर्थिक मानात बदल झाला तरी त्याचा अधिक लाभ हा अधिक श्रीमंतांनाच अधिक झाला, हे कोण नाकारेल? कमी श्रमात अधिक लाभ कमावण्याची नागरी व मध्यमवर्गीय मानसिकता ग्रामीण युवकांत मूळ धरत आहे. विनाश्रम विलासी जीवन जगण्याची वाढती प्रवृत्ती हा ग्रामीण राजकारण्यांनी निर्माण केलेला नवा सामाजिक रोग आहे, याचीही गंभीरपणे नोंद घेणे आवश्यक आहे.

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/८९