पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/80

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याऐवजी आपण सारं भौतिक रूपात देणं पसंत केलं. परिणामी, घरातील माणसं ही फिरत्या रंगमंचाचे कलाकार झाली.
 घरी बाळ झाल्यापासून त्या बाळास बाळ होईपर्यंतचा प्रवास म्हणजे माणसाची माणसात असलेली अतूट, पक्की गुंतवणूक होती. बाळ जन्मलं की त्याला तेलपाणी करायला घरी आत्या, मावशी, मामी होती. शेक-शेगडी समजावयाला आजी होती. बाळाच्या पोटात दुखू लागलं समजायला आजीचा बटवा होता. बाळाला घरा-घरातून झबली-टोपडी यायची. या सर्वांत मायेचा अमीट गंध दरवळत रहायचा. मूल आईच्या दुधावर मोठं व्हायचं. टी.व्ही. चं ‘केअर'चॅनल असो वा अन्य ते झटपट उपाय शिकवत रहातं. जॉनसन बेबी पावडर, काँप्लॅन, हगीज् यांनी मायेला मागे सारून पैशाचा दर्प बाळभोवती पसरला. पैसा असला की कुणीही नसलं तरी चालतं अशा आत्मकेंद्री तत्त्वज्ञानचा विकास हे माध्यमांचं मायेवर झालेलं आक्रमणच होय.
 पूर्वी आजी बाळाला गोष्टी सांगायची. संस्कार द्यायची. आजी वृद्धाश्रमात गेल्यापासून गोष्टींची जागा मल्टीमिडियानी घेतली. घरात गोष्टीच्या कॅसेटस, सिडीज् आल्या. व्हिडिओ गेम आहे. पूर्वी घरात बाळाच्या तोंडात ‘निपल' देणं हा अपराध समजला जायचा. आता बाळाची दिवसभराची सोबत टेडी बिअर, डोनाल्ड डक, डोळे उघडझाप करणारी बाहुली करत रहाते. यंत्रांनी घेरलेल्या घरात आईला एकुलत्या बाळाला घ्यायची फुरसत राहिली नाही. आईची 'मम्मी' झाल्यापासून तिला आपल्या ‘फिगर'ची चिन्ता अधिक, 'करिअर' हेच तिचं मिशन. मुलांनी मागेल ते दिल की धन्यता मानणारे ‘डॅडी' सतत बाहेरची (?) टेन्शन्स घेऊन घरात वावरत असतात. पूर्वीचे ‘घोडा घोडा' खेळणारे बाबा आता घरोघरी ‘बागुलबुआ' झालेत, त्यांना हँग ओव्हर असतो, अपॉईंटमेंटस् (?) असतात, ते बोलते झाले तरच घरच्यांनी त्यांच्याशी बोलायचं असा शिरस्ता घरोघरी रूढ होतो आहे.

 मुलांना वाढवणं म्हणजे देणं अशी कुटुंबात रूढ झालेली धारणा. त्यामुळे पालक व पाल्यात असंवादाची निर्माण झालेली स्थिती हे नव तंत्र माध्यमांनी घरांचं केलेलं विस्थापन. हा दूरदर्शन, इंटरनेट, चॅनेल्सनी केलेल्या आक्रमणाचाच परिणाम व परिपाक होय. मुलं हल्ली व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात, संस्कार वर्गात घडतात. घरोघरी टी.व्ही, इंटरनेट, चॅनल्समुळे लैंगिक शिक्षण लवकर होतं. लैंगिक जाण शरीरात लवकर विकसित होते. ती विभिन्न चेतक दृश्यांच्या गराड्यामुळे. मुलं पालकांपेक्षा वेगवेगळ्या कारणांनी (शाळा, क्लास, सहल, पार्टी, शिबिर, वर्ग, स्पर्धा इ.) मित्र-मैत्रिणींच्या सहवासात अधिक असतात. पालकांना बोलावल्याशिवाय शाळा, कॉलेजीकडे न

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/७९