पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/79

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सगळं खरं असलं, तरी साधनांच्या ‘बुल फायटिंग'मध्ये माणूस स्वतःला हरवून बसला हे मात्र खरं! या चढाओढीनं समाजरचनेत व कुटुंब व्यवहारात क्रांती घडवून आणली. माणुसकी, समाजशीलता, समजदारी, संवेदनशीलता, सामाजिक प्रतिबद्धतासारख्या मूल्यांना तिलांजली देण्याचे सारे दुष्परिणाम घरोघरी रुजले ते टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेटमुळे. याचा खोलात जाऊन आपण समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय अभ्यास करू लागलो तर असं लक्षात येतं की आक्रमण साधनापेक्षा साध्याच्या स्तरावर अधिक झालं नि त्यामुळे आपण घरपण गमावले.
 पूर्वीच्या कुटुंबापुढे आजच्याइतकी डोळे दिपवणारी आकर्षणं नव्हती. साधेपणाचा कोण सोस माणसास होता. मूल्यनिष्ठा हा जीवनाधार होता. हॉटेलमध्ये जायचं नाही. विकतचं खायचं नाही. खायचं ते एक तीळ सात जणात वाटून खायचं. दुखलं-खुपलं तर सेवा-शुश्रूषा करायची. एकमेकांच्या घरी जाणं, येणं, राहणं हा विरंगुळा होता. आतिथ्यशीलता हे घराचं वैभव होतं. धावून जाण्यात धन्यता वाटायची. हे कौटुंबिक जगणं यंत्र, शहर, साधनसंपन्नतेच्या हव्यासापोटी आपण गमावून बसलो, ते क्षणिक सुखाच्या ध्यासापोटी.
 माणसाचं जगणं म्हणजे केवळ श्वासोच्छ्वास नव्हे. जगणं असतं थबकत, समजून घेत केलेला प्रवास. पन्नासएक वर्षांपूर्वी घरात वीज नव्हती. गॅस नव्हता. पण निसर्गसंपन्न जगणं होतं. गरम जेवणाची चव मातीच्या धुपाच्यातून येत राहायची. घरभर एक अहोरात्र कार्यसंस्कृती नांदत होती. निवडणं, कुटणं, पिसणं, सोलणं, चिरणं, वाळवणं, धुणं, शिजवणं, वाढणं, सारवणं, लिपणं, किती कामं? दिवस कसा बुडायचा कळायचा नाही. प्रत्येक हाताला काम होतं. प्रत्येक अंगाला घाम होता. जगणं आनंददायी उत्सव होता. आता जगणं ही एक जीवघेणी स्पर्धा झालीय. यात दोष साधनांचा नाही. माणसांनी ‘विनियोग विवेक' गमावला नि हे सारं अरिष्ट अंगावर आलं.

 ‘मी आणि माझं' ही आत्मकेंद्री वृत्ती प्रत्येक माणसात फोफावली. त्यामागे माणसास कुटुंबांनी जगण्याचं स्वास्थ्य लीलया दिलं, हेही एक प्रमुख कारण आहे. माणसास जी गोष्ट सहज मिळते त्याचं अप्रूप असत नाही. गेल्या शतकातील पिढीच्या तुलनेत वर्तमानातील पिढीस आपण कुटुंब म्हणून समृद्धी दिली. जाणीव, जबाबदारी, संस्कार फार कमी दिले. कुटुंबाची घडण खरं तर वेळ देण्यानं, सहवासानं, संवादानं, एकमेकांसाठी करण्यातून होत असते.

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/७८