पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/81

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

फिरकायच्या त्यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे नवी पिढी बेलगाम झाली तर तिला दोष देणं चुकीचं. 'सातच्या आत घरात ही वेळ नव्हे मर्यादा' असं सांगितलं गेलं तरी ती मर्यादा पालकच पाळत नसल्यामुळे आपली घरं, कुटुंबं ही गेस्ट रूम, वेटिंग रूम, ट्रान्झिट रूम होऊ लागली आहेत.
 भाड्याच्या घराऐवजी स्वतःची घर बांधणं, सायकल ऐवजी टू व्हिलर घेणं-उच्च मध्यम वर्गात फोर व्हिलर, घरातील प्रत्येकां स्वतःचं वाहन, प्रत्येकाच्या खिशा, पर्समध्ये मोबाइल, डोळ्यावर गॉगल (एकतर्फी जग पाहणं व्हावं म्हणून!) घरात म्युझिक सिस्टिम (न वापरता दिवाणखाना सजवणारी) हे सारं होणं म्हणजे आयुष्याचं सार्थक मानणारी कुटुंबं घरोघरी विकसित झालीत. त्यात प्रत्येकाचं आयुष्य खासगी. घरात मिसकॉल तुझा की माझा म्हणून होणारी बहीण-भावातील भांडणं आता आई-बाबांमध्ये पण होऊ लागणं ही कुटुंबव्यवस्था पार उद्ध्वस्त झाल्याचीच निशाणी ना? मुक्तीच्या नावाखाली आईचं मुलीची मैत्रीण होणं, बाबा बॉय फ्रेंड इतके कॅज्युअल वाटणं हे सारं केवळ टी.व्ही., चॅनेल्स, इंटरनेटमुळे झालं असं मानायला मात्र मी तयार नाही. हे खरं तर सारं घडलं ते अल्पकालात गतीने आलेल्या वैभवी परिवर्तनामुळे. भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या समृद्धीची पहिल्या धारेची ही नशा. तिनं आपणाला स्वैर, सैल केलं.

 चॅनल्स, नेटच्या मार्गानी कुटुंबावर होणारं आक्रमण थोपवायचं आपल्या हाती आहे. निराश व्हायचं मुळीच कारण नाही. चूक झाली आहे खरी पण ती दूर होणारी, दुरुस्त होणारी आहे. हिंदीत त्याला ‘देर आये, दुरुस्त आये म्हणतात. उशीरा का असेना, दुरुस्ती करणं महत्त्वाचं. कुटुंबाचं हरवलेलं घरपण पुन्हा बहाल करणं, यंत्रघराचं माणूसघर करणं शक्य आहे. त्यासाठी गरज आहे जीवनाच्या आकांक्षा नि स्वप्नांच्या फेरमांडणीची. कुटुंब म्हणजे सहवास असतो. आई-बाबांनी आपल्या मुलांना आता मागेल ते देऊन चालणार नाही. वेळ द्यायला हवा. घरी वेळ घालवायला हवा. घरी संवाद, सुसंवाद वाढायला हवा. सपरिवार मित्र- पाहुण्यांच्या घरी जाणीवपूर्वक येणंजाणं करत राहायला हवं. नाती टाळण्यापेक्षा दृढमूल करण्याकडे कल हवा. दुखलं-खुपलं की औपचारिक विचारपूस (तीही फोन वर वा ई-मेलनी) हे बंद व्हायला हवं. वेळेचे व्यवस्थापन हा जीवन सुस्थापनाचाच एक अविभाज्य भाग मानायला हवा. साध्या औपचारिकतेजागी नव्याने अनौपचारिकता जाणीवपूर्वक रुजवायला हवी. हे घड्याळाचे काटे उलटे फिरवणे मानू नये. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने ही दुरुस्ती हवी. पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे. मनुष्य नि मनुष्यता तिच्यापुढे जाऊन भूतदया येईल तर जग

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/८०