पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/52

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दिव्याबरोबर एमएसईबीचे दिवे पण जळत राहतात. असे टोकाचे देशप्रेम निर्माण झाल्याशिवाय येथील प्रजासत्ताक समृद्ध होईल अशी आशा कशावर आधारून करायची?....
 फ्रान्सच्या प्रवासात मी मेट्झ या छोट्या गावी होतो. तेथून लुक्झेम्बर्ग जवळ होते म्हणून जाऊन यायचे ठरले. जगात तीनच शहरांना राष्ट्र म्हणून दर्जा आहे. त्या शहराचं स्वतःचं चलन, सैन्य, तिकिटं, ध्वज, सरकार, पोलीस सारं.... एक लुक्झेम्बर्ग, दुसरं व्हॅटिकन आणि तिसरं सिंगापूर. मी ही तिन्ही शहरं-राष्ट्रं पाहिलीत. लुक्झेम्बर्ग हे बँकांचं शहर. जगभरच्या बँका तिथं आहेत, शहर दहा ते चार गजबजलेलं. इतरवेळी शुकशुकाट, रविवारी शहर पाहण्यास पर्यटक मोठ्या संख्येने येतात. पार्किंगचं बुकिंग असतं. ते झाल्याशिवाय रविवारी शहरात गाडी पार्क करणं कर्मकठीण. आम्ही अनाहूत गेलेलो. अर्धा तास फिरूनही (मोटारीनंच!) जागा मिळाली नाही. शेवटी दंड होणार हे गृहीत धरून गाडी नॉन पार्किंग झोनमध्ये थांबवली. शहर फिरून आलो. अपेक्षेप्रमाणे गाडीवर दंडाचं बिल लागलेलं! पोलीस वाट पाहातच होता. छान सलाम केला. 'माफ करा', तुम्हाला दंड करावा लागला. झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व!,' म्हणणारा पोलीस आपल्या प्रजासत्ताकाच्या पन्नास वर्षांच्या प्रवासात एक अब्ज लोकांपैकी कुणाच्या तरी स्वप्नात आला का? माझ्या मैत्रिणींनी कसलीही चर्चा न करता खजिलपणे भरलेला दंड मला आठवतो, शिवाय तिचं ते पुटपुटणं, 'आयुष्यात पहिल्यांदा दंड भरायची नामुष्की आली...'तिच्या बोलण्यात पैशापेक्षा देशप्रतिष्ठा गमावल्याचं, नागरी कर्तव्याचे उल्लंघन झाल्याचं दुःख मोठं होतं! तिच्यासारखे अपराधी अश्रू आपल्या प्रजाजनांच्या डोळ्यात तरळतील तर हा भारत ख-या अर्थाने 'इंडिया रिपब्लिक' होईल...

 ही नि अशी जितकी उदाहरणं सांगावी तितकी थोडी आहेत... प्रश्न आहे आपला आचार, विचार, व्यवहार बदलायचा. विदेश म्हणजे केवळ ‘परदेश' नव्हे तर ‘विशेष देश.' आपलं प्रजासत्ताक इतर देशांच्या अनुकरणाचा केंद्रबिंदू होईल, असा ध्यास आपण घ्यायला हवा, प्रजासत्ताकाच्या येत्या पन्नास वर्षांच्या वाटचालीत आपणास कसा देश घडवायचा आहे हेच नक्की झालेलं नाही. सरकारानुगणिक शिक्षण बदलून चालणार नाही. येत्या पन्नास वर्षांतील भारताचं सर्वमान्य चरित्र आणि चारित्र्य ठरवलं गेलं पाहिजे. प्रश्न महात्मा गांधींचा देश की सोनियांचा हा असता कामा नये. हा देश महात्मा गांधींच्या स्वप्नातील स्वदेशी प्रजासत्ताक व्हायला हवा. पण हा स्वदेश ‘आत्मनिर्भर प्रजासत्ताक' होईल असं पाहायला हवं! स्वच्छ, सुंदर, सुसंस्कृत

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/५१