पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/49

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सुवर्णमहोत्सवी प्रजासत्ताक : एक मशागत



 महात्मा गांधींनी देश स्वतंत्र करण्यासाठी ज्या अनेक चळवळी नि आंदोलने केली, त्यात ‘स्वदेशी आंदोलन' महत्वाचे होते. खादीचा पुरस्कार, बुनियादी शिक्षण (तालीम),देशात साधनांची कमतरता म्हणून केवळ त्यांचं धोतर वापरणं, परचुरे शास्त्रींची त्यांनी केलेली कुष्ठसेवा, मिठाचा सत्याग्रह, दांडी यात्रा, सविनय अवज्ञा आंदोलन- एक ना अनेक मार्गांनी खरे तर गांधीजींनी स्वराज्याचा स्वदेशी वस्तुपाठच घालून दिला होता. आपल्या स्वराज्याची स्वातंत्र्यपूर्व काळात इतकी मशागत होऊनही आपण कशात मशगूल झालो की जेणेकरून गेल्या पन्नास वर्षांत या सर्व गोष्टी विस्मृतीच्या गर्तेत जाऊन वस्तुसंग्रहालयातील दुर्मीळ दस्तावेज, पुरावे वाटू लागले...
 ‘स्वातंत्र्य' मिळाल्यानंतर आपण ‘स्वराज्य' ही मिळवलं. भारत ‘प्रजासत्ताक' देश झाला. पण आपल्या 'स्वराज्याचं' सुराज्य काही होऊ शकलं नाही! आपल्यानंतर स्वतंत्र झालेला व जगाच्या नकाशावर ‘टिंब' अस्तित्व असलेला इस्रायलसारखा देश वांशिक व सीमा संघर्षाच्या प्रतिकूलतेतूनही ‘प्रभुसत्ता' होतो. पण आपल्याकडे देशभक्ती, देशाभिमान, देशशिस्त, देश संस्कृती, देशमूल्य नावाची एकही गोष्ट प्रजासत्ताकाच्या सुवर्णमहोत्सवी प्रवासात रुजू शकली नाही, याची मेख कशात आहे? असा प्रश्न नेहमीच मला अस्वस्थ करत आलाय!

 विशेषतः मी जेव्हा जेव्हा विदेशी गेलोय तेव्हा या प्रश्नाने मला हैराण केलेले आठवते. महात्मा गांधींच्या स्वदेशी भारतात विदेशी (इंपोर्टेड) व्यक्ती, वस्तू, विचार व्यवहारांचं इतकं आकर्षण का? असं विदेशी मित्र-मैत्रिणी विचारतात तेव्हा मी निरुत्तर असतो. आपण आयातीत भारत (इंपोर्टेड इंडिया)

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/४८