पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/170

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

‘शाळाभेट' पुस्तक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, सर्व शिक्षक यांनी १00 रुपये खचून वाचायला पाहिजे, ते अशासाठी की त्यात महाराष्ट्राच्या जि. प. प्राथमिक शाळांनी जे आदर्शभूत काम केले आहे. त्याच्या यशोगाथांचे 'Success Stories'चे ते पुस्तक आहे. आपल्या प्रत्येक शाळा अशा व्हाव्यात म्हणून आपल्या शिक्षकांचे नेते सर्वश्री राजाराम वरुटे, भरत रसाळे या दोघांनाही पुस्तक भेट पाठवले होते. इच्छा अशी होती की त्यांनी ते वाचावे. प्रत्येक शिक्षकाला वाचायला सांगावे. पुढे त्यांचे काय झाले ते कळाले नाही.
 आज जिल्हा परिषदांच्या शाळातून मागं राहणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे व्यक्तिगत लक्ष देऊन तो विद्यार्थी मध्य प्रवाहात यावा म्हणून त्याचे प्रगती पुस्तक ठेवले जाते. शिक्षक शाळेच्या वेळेआधी, नंतर, सुट्टीतही अशा मुलांसाठी काम करतात. शाळा सुटल्यानंतर विद्याथ्र्यांअगोदर पळणारे शिक्षक असे पूर्वी असलेले चित्र बदलले आहे. हे पण आपण प्रसारमाध्यमांद्वारे समाजापर्यंत पोहोचवले तर गमावलेला विश्वास आपण परत मिळवू शकू. आज प्रत्येक शिक्षकाकडे मोबाईल्स आहेत. सहविचार सभांत मला अनेक शिक्षक माझ्या व्याख्यानांचे ध्वनिमुद्रण, व्हिडिओ शूटिंग करताना दिसतात. याचा वापर आपण शैक्षणिक साधन म्हणून का नाही करायचा? चांगली भाषणं, साहित्यिकांचे आवाज, कविता, डिस्कव्हरीच्या क्लिप्स का नाही मुलांना ऐकवायच्या, दाखवायच्या. कितीतरी शिक्षक मित्र, गावातील शाळेचे हितचिंतक यांच्याकडे एम.पी.श्री. प्लेअर, डी.व्ही.डी.प्लेअर असतो. तो शाळेत आणून का नाही गाणी, गोष्टी, चांगले चित्रपट, सी.डी. दाखवायच्या? याला काहीच पैसे लागत नाहीत, लागते ती दृष्टी व उपक्रमशीलता.
 या नि अशा अनेक गोष्टींतून आपणास जिल्हा परिषदांच्या शाळा जिवंत, प्रयोगशील, उपक्रमशील स्वच्छ, सुंदर, गुणवत्ता केंद्री बनवणे शक्य आहे. अवघड असले तरी अशक्य मात्र नाही. गरज आहे प्रत्येक शिक्षकाने स्वाभिमानी प्रतिबद्ध, समर्पित, संवेदनशील व्हायची. परिपत्रकांच्या फतव्याशिवाय जेव्हा शाळा व शिक्षक जागे राहतील तो सुदिन! मी त्याची वाट पाहात आहे...

■■




एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१६९