पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/119

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एकविसाव्या शतकातील पालकांपुढील आव्हाने
 एकविसाव्या शतकातील पालक गेल्या शतकाच्या तुलनेने प्रगल्भ आहेत नि समृद्धही. एक तर त्यांचं शिक्षणमान उंचावलं आहे. गेल्या शतकातील वडील म्हणजे पालक ही कल्पना मागे पडून पालक म्हणजे आई-वडिलांची संयुक्त भागिदारी ही कल्पना रुजली आहे. सामाजिक संकल्पना विकासात विस्तारित कुटुंब हा पालकत्वाचाच भाग मानला जातो. म्हणजे विभक्त कुटुंब असेल तर सख्खे मोठे भाऊ, बहीण व नातेवाईक (काका, मामा इ.) ते औपचारिक संबंध ठेवून असले तरी आधारवड म्हणून पालकत्वात त्यांचे महत्त्व आहे. घरातील स्त्रिया सुशिक्षित होऊ लागल्या. त्यांची पालक म्हणून जबाबदारी, भागिदारी रोज वाढते आहे. पालकभान आलेली, जबाबदारीची जाणीव झालेली पालकांची पिढी सध्या चक्रव्यूहात अडकलेली आहे. हातात पैसा, साधनं आहेत पण वेळ नाही. कळतं पण वळत नाही अशी त्यांची स्थिती आहे. शिक्षकांचेही तेच. आवड आहे पण सवड नाही. यात कुणाला अपराधी म्हणून आरोपीच्या पिंज-यात नाही उभं करता येणार. प्रश्न आहे तो पाल्यांची पिढी वाहून जाण्याचा.
 आदर्श म्हणून गरजा कमी करणं, वेळ देणं, साधं राहणं, घरात सुसंवादी वातावरण निर्माण करणं हे सारं सुचविता येईल. पण श्रीमंत, मध्यमवर्गीय नि गरीब साच्याच पालकांची स्थिती अशी आहे की काळानं त्यांची शिकार केलेली आहे. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत विकासाच्या वारूवर स्वार सगळे देश अडथळ्याची शर्यत पार करत काळाचे महासत्ताधीश होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत. पालक त्या प्रतिमेचं छोटं रूप इतकंच. असं असलं तरी विपरीत वास्तवातून शहाणपणाचा मार्ग ज्याचा त्यानंच शोधला पाहिजे. कारण पालक पाल्य संबंध व प्रश्न कुटुंबागणिक भिन्न असतात, तसेच ते सोडवण्याचे उपायही. गेल्या शतकात काळ शिथिलगती होता, तो आत शीघ्रगती आहे. गतीचं गणित प्रकाश व ध्वनीगतीच्या गणितापलीकडचे बनले असल्याने व घड्याळाचे काटे उलटे फिरवणे कुणाच्याच हाती नसल्याने ‘प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा' एवढंच आपल्या हाती आहे. हे लक्षात ठेवून मार्ग काढता येणे शक्य आहे.
एकविसाव्या शतकातील मुलांचे प्रश्न

 सन २००० मध्ये मुलांविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार व कार्य करणाच्या युनोशी संलग्न ‘युनिसेफ' या संघटनेने 'Emerging issues for children in the Twenty First century' या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद बोलविली होती. त्यात जगातील बहुसंख्य देशांचे प्रतिनिधी उपस्थित

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/११८