पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/118

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ते हतबल असतात. बळी ठरतात ती त्यांची अपत्ये. आहार, आरोग्य, शिक्षण, रहिवास इ. त्यांचे प्रश्न रोज ऐरणीवरचे बनत आहेत. कुपोषण, बालमृत्यू, दुर्लक्षामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात येते. या वर्गासाठीच्या आरोग्य सुविधा स्वस्त व पुरेशा नाहीत. शिक्षणाअभावी मजुरीपलीकडे उपाय नि भविष्य नाही. ज्यांना आहे त्यांना कशाचीच ददात नाही, नाही त्यांना काहीच नाही. या विषमतेमुळे बळी तो कान पिळी अशी स्थिती झाली आहे. आर्थिक वाटणीच्या स्तरावर ‘आंधळं दळतं, कुत्रं पीठ खातं' अशी स्थिती आहे.
 एकविसाव्या शतकातील खरे आव्हान असामाजिकता, असहिष्णुता, असंघटितता, दहशतवाद, जाती धर्माचे वाढत चाललेले स्तोम व वर्चस्व, दैववादी वृत्तीत वाढ हे असल्याने येथील कुटुंबे व पाल्य यांच्यावर त्यांचा सरळ परिणाम होतो आहे. भ्रामक सुखात अंध होणारा समाज, आयपीएल क्रिकेट, वाहिन्यांवरील अनैतिकता घरोघरी पोहचवणाच्या कार्यक्रमांचे नियमित रतीब, लाल दिव्याची गाडी, वरचं उत्पन्न इ. च्या सुप्त आकांक्षांना बळी पडून स्पर्धा परीक्षांकडे धावणारी, नवश्रीमंतीची स्वप्ने पाहणारी युवा पिढी, सिनेमामागे धावणारी ग्लॅमर जनरेशन, राजकारण्यांमागे धावणारा ग्रामीण बेरोजगार तरुण, भ्रष्टाचार, मूल्यहीनता इ. मुळे कांचनमृगामागे धावणारा समाज त्याने 'स्वत्व’ आणि ‘सत्व' गमावलं आहे. भाषावाद, जातीय अभिमान, संकुचितता, प्रत्येकास हवं असणारं आरक्षण यामुळे समाज सावकाशपणे नव्या यादवीकडे वाटचाल करत असल्याचे आजचे चित्र अस्वस्थ करणारे आहे. याचे सरळ परिणाम घरातील मुलांवर होत आहेत.

 जागतिकीकरण, आर्थिक उदारतेचे धोरण, खासगीकरण, महाग होत जाणारे शिक्षण, आरोग्य नि आहार, संपर्क साधनांचे वाढते आक्रमण व त्याचे गारुड, टी.व्ही. व वाहिन्यांचे आकर्षण व सामाजिक संमोहन, शिक्षकपालकांच्या बदलत्या भूमिका व भावनिक कोरडेपणात होत जाणारी वाढ यामुळे मुलांचे हक्क, मानवाधिकार यांना सरळ सरळ आव्हाने देणारी परिस्थिती येऊन ठेपली आहे. कुटुंब भावनेचा होत चाललेला संकोच हे मुलांच्या भविष्यापुढचे आव्हान आहे. भरल्या घरात सर्व असून मुलं निराधार वाढणं हे समाजभावनेचा पराभव करणारं आहे. 'मुकी बिचारी कुणी हाका' अशी स्थिती झालेली नवोन्मेषी पिढी त्यांच्या प्रश्नांना वाली कोण? त्यांचा वकील कोण? बिनदुधाचं फसवं बोंडलं तोंडात धरून चाखत-चोखत मोठी होणारी पिढी- तिचा खरा संघर्ष, अस्तित्व, ओळख, विकास, स्वप्न, स्वावलंबन आणि उपजीविका राहणार की जगणं हाच संघर्ष होणार हे समजून घ्यायचं तर नवागत मुलांचे प्रश्न आपण पुरेशा गांभीर्याने समजून घेतले पाहिजेत.

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/११७