पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सादर करून शिक्षणप्रक्रिया जीवनभर चालत राहिली तरच ती उपयुक्त ठरेल, असे बजावले होते. केवळ १४ ते २० वयोगटात शिक्षण दिले-घेतले की संपले अशी जगभरची समजूत चुकीची असल्याचं भान त्या अहवालानं दिलं होतं; पण जगाने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी गेल्या पंचवीस वर्षांत शिक्षण क्षेत्रात अराजकाची स्थिती निर्माण झाली. शिक्षण विस्तारलं, गतिशील झाले खरे; पण त्याने आपल्या उद्दिष्टांच्या गाभाघटकासच तिलांजली दिल्यासारखी स्थिती निर्माण झाली.
 हे पाहून 'युनेस्को'ने पाच वर्षांपूर्वी (१९९३) जगातील विविध देश व देशातील पंधरा जणांचा एक आयोग नेमून, जागतिक शैक्षणिक स्थितीचा आढावा घेऊन उपाय सुचविण्यास सांगितले होते. युरोपियन कमिशनचे अध्यक्ष जॅक्स डेलॉस या आयोगाचे प्रमुख होते. त्यांनी तीन वर्षांच्या अल्पावधीत (१९९६) आपला अहवाल ‘युनेस्को'स सादर केला. 'Learning : The Treasure Wotjhom' नावाने प्रकाशित हा अहवाल एकविसाव्या शतकातील शिक्षकांपुढील आव्हानेही अधोरेखित करीत असल्याचे अहवाल वाचताना पदोपदी जाणवते.
 विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगात अनेक देश स्वतंत्र झाले. त्यांतील काही पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त झालेले दिसून येतात. शेकडो वर्षे गुलामगिरी, अज्ञान, अत्याचारांचे बळी म्हणून जगत राहिलेले हे देश प्रामुख्याने आशिया, आफ्रिका खंडांतील होते. विकसनशील देश म्हणून त्यांना ओळखले जाते. एकविसाव्या शतकात या देशांची स्थिती आजच्या तुलनेने समृद्ध राहणार आहे. दुसरीकडे, याच काळात अनेक देशांत राजकीय उलथापालथी झाल्या. काही देश विभाजित झाले, तर जर्मनीचे एकीकरण झाले. रशिया दुभंगला. हंगेरी, पोलंड, झेकोस्लोव्हाकियासारख्या देशांत वैचारिक प्रवर्तन घडून साम्यवादी विचारव्यवस्था कोलमडून पडली. या सर्व व्यामिश्र स्थितीमुळे शिक्षणाचे पारंपरिक स्वरूप कालबाह्य ठरले. पूर्वीच्या शिक्षणाच्या तीन 'र'कारी (Three 'R' Reading, Writing, Arithmetic) चौकटीतील कक्षा रुंदावून नव्या शतकाचं शिक्षण नैतिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, तांत्रिक, आर्थिक व सामाजिक आशयसंपन्न करणारे असायला हवे, असे वरील अहवालात नमूद करण्यात आलं आहे. नव्या शतकाचा शिक्षक आता बहुआयामी (अष्टपैलू) असायला हवा. एकविसाव्या शतकातील शिक्षणास मानवी जीवनाचे भविष्य ठरविणारा प्रभावी घटक मानण्यात आल्याने नव्या शिक्षण पद्धतीत यंत्र नि तंत्र व साधनसमृद्धी गृहीत धरूनही शिक्षकाचे अनन्यसाधारण महत्त्व रेखांकित केले

आहे.

एकविसाव्या शतकातील शिक्षण/९७