पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/69

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घालून ओष्ठवाचन, भाषाग्रहण, लेखन, वाचन इत्यादींचा विकास करणं यांच्या शिक्षणातील महत्त्वाचे टप्पे असतात. उच्चारोपचार पद्धती ही या शिक्षणप्रक्रियेतील महत्वाची प्रक्रिया असते. अशा मुलांमधील मूकबधिरतेमुळे आलेला न्यूनगंड कमी करून, घालवून त्यांच्यात शिक्षणविषयक आत्मविश्वास व गोडी निर्माण करणं हे शिक्षकांचे प्रमुख काम असतं. शाळेतील इतर मुलांप्रमाणेच आपण बोलू, लिहू शकतो, अशी प्रचिती येईल तशी या मुलांची प्रतिसाद भावना वाढते. अशा मुलांना शिकवित असताना शिक्षकांमध्ये मोठा संयम व सहनशक्ती असणं आवश्यक असतं. शिक्षणाच्या विविध पद्धतींत अधिक आव्हानात्मक असलेलं हे काम सामाजिक जाणिवेतून करण्याच्या त्यागी व सेवाभावी शिक्षकांची आज खरी गरज आहे. अशा वंचित बालकांना शिक्षण देणाच्या संस्था आज महानगरांत केंद्रित आहेत. त्या भविष्यकाळात गावपातळीवर सुरू होणे गरजेचे आहे.

 यास अपंगमती वा मतिमंद बालकांचे शिक्षण असंही म्हणता येईल. ज्या बालकांचा बुद्धिगुणांक सरासरीपेक्षा कमी असतो आणि त्यामुळे ज्यांना भोवतालच्या परिस्थितीशी मिळते-जुळते घेण्यात अडचण निर्माण होते, अशा बालकांना मतिमंद किंवा अपंगमती बालक समजण्यात येते. मर्यादित अनाकर्षकता, अपुरा व्यक्तित्त्व विकास, अपुरे सामाजिक समायोजन, मानसिक एकाग्रतेचा अभाव अशी लक्षणे दिसून येणा-या बालकांना मतिमंद समजण्यात येतं. शिक्षणाच्या दृष्टीने मतिमंदांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करण्यात येतं. १) शिक्षण देता येण्याजोगे मतिमंद २) कौशल्य शिकविता येण्याजोगे मतिमंद ३) अतिमतिमंद. या त्यांच्या वर्गीकरणानुसार त्यांना शिक्षण, प्रशिक्षण देण्याच्या पद्धती भिन्न आहेत. त्यांना शिक्षण देत असताना प्रमुख अडचणी जाणवतात, त्या म्हणजे यांच्यात एकाग्रतेचा अभाव असतो. भावनिक अपरिपक्वता, उतावीळपणा, स्मरणशक्तीचा अभाव, कमजोर भाषा इत्यादी या अडचणी दूर करण्याच्या हेतूनेच त्यांच्या शिक्षणाची उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. या शिक्षणात औपचारिक ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञान, दैनंदिन क्रिया स्वतः करण्याचे कौशल्य निर्माण करणे इत्यादींवर भर देण्यात येतो. अन्य अपंग आणि वंचित बालकांच्या शिक्षणाची पद्धत भिन्न असल्याने यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची गरज असते. या शिक्षणात मतिमंदांचे वर्गीकरण, प्रत्येक मतिमंदाच्या मर्यादा व त्यात साधायचा अपेक्षित विकास या सर्व घटकांचा विचार करून शिक्षकास अध्यापन व कौशल्यविकासाचे काम करावयाचे असते.

एकविसाव्या शतकातील शिक्षण/६८