पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रक्रिया गतिमान होते, असे संशोधनांती सिद्ध झालं आहे. मर्यादित भाव नि अनुभवविश्व हा अंध बालकांच्या शिक्षणातील मोठा अडसर असतो. विविध प्रयत्नांनी अंध बालकांचे अनुभवविश्व विस्तारणं हे अंधांना शिकविणा-या शिक्षकाचे प्रमुख काम असते. वैयक्तिक लक्ष देण्याची एक मोठी जबाबदारी अशा शिक्षकांवर असते. अंध बालकांची परावलंबिता कमी करणे हा अशा शिक्षणाचा प्रधान हेतू असतो; म्हणून शिक्षणात व्यवसाय प्रशिक्षणावर जोर द्यावा लागतो. अंधांना शिकविणारे शिक्षक प्रशिक्षित असणं गरजेचे असते.
 अंधांच्या शिक्षणाचा प्रश्न अनाथ व अपंगांच्या शिक्षणापेक्षा सर्वथा वेगळा असतो. शिक्षण ही एक ज्ञानग्रहण प्रक्रिया आहे. ८०टक्के ज्ञान मनुष्य डोळ्यांद्वारे ग्रहण करतो असे मानले जाते. याचाच अर्थ असा की २०टक्के क्षमता असलेल्या अंधांना सर्व १००टक्के सामान्य ज्ञान ग्रहण करण्यासाठी सरासरी प्रयत्नांपेक्षा किमान ८०टक्के अधिक प्रयत्न करावा लागतो. लुईस ब्रेल याने तयार केलेल्या लिपीद्वारे अंध स्पर्शज्ञानाचे औपचारिक शिक्षण घेऊ शकतात, हे जरी खरे असले तरी ब्रेल लिपीतील पुस्तके सर्वांना परवडणारी नाहीत. शिवाय अशा पद्धतीने औपचारिक शिक्षण घेण्यावर मर्यादा येते. यामुळे अंधांसाठी त्यांची मर्यादा व क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र शिक्षणक्रम असण्याची गरज आहे.

 मूक, बधिर बालकांची शिक्षणविषयक समस्या त्यांच्या श्रवणहीनता व वाचाहीनतेतून निर्माण होत असते. बालकांचे प्राथमिक शिक्षण वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत केवळ श्रवणेंद्रियांद्वारेच होत असते. या काळात ती सुमारे २००० शब्द शिकू शकतात; पण बहिरेपणामुळे या शिक्षणास मुलं पारखी होतात. वस्तूंना नाव असते ही कल्पनाच या मुलांना नसते. आपल्या दैनंदिन गरजा, संकल्पना ही मुले हावभाव, खाणाखुणा, संकेत इत्यादींद्वारेच व्यक्त करू शकतात. वस्तुबोध, कल्पना व भावनांच्या प्रकटीकरणाचा अभाव यांमुळे अशा मूक, बधिर बालकांना शिक्षण देण्याची शास्त्रशुद्ध पद्धती, साधने आज विकसित झाली असून अशा बालकांना शिकविण्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. अशा मुलांत भाषा, भाव, शक्ती निर्माण करण्यासाठी दृक्श्राव्य साधनं, चित्रं, रंगीत कार्डस, आकडे, आरसे, छायाचित्र, नकाशे, प्रतिकृती, अंतरोपरिदर्श, चित्रपट, दूरदर्शन संच इत्यादी साधने वापरली जातात. या मुलांचे शिक्षण प्रमुख्याने : तीन घटकांवरच अवलंबून असतं. १) मुलाची जन्मजात बुद्धिमत्ता, २) मुलाची शिकण्याची प्रवृत्ती, ३) श्रवण व वाचाशक्ती. वरील साधने व या मर्यादा यांचा मेळ

एकविसाव्या शतकातील शिक्षण/६७