पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/32

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 लोकशाहीकरण करीत असताना आपणास विद्यापीठाच्या धर्तीवर प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी स्वतंत्र अशा स्वायत्त संस्था स्थापन कराव्या लागतील. या संस्था पाठ्यक्रम, परीक्षा, प्रशासन इत्यादी कार्ये करतील. या स्वायत्त संस्थेच्या घटकसंस्था म्हणून स्थानिक शिक्षण मंडळ (प्रत्येक शाळेचे) राहील. या मंडळात उल्लेखिल्याप्रमाणे सर्व घटक असतील. सध्या महाविद्यालयाच्या प्रशासनासाठी स्थानिक व्यवस्थापन मंडळ आहे. त्याची पुनर्रचना करून लोकशाहीकरण करणे सहज शक्य आहे. ही कल्पना सर्व स्तरांवर राबविल्यास पाठ्यक्रम, परीक्षा, प्रशासन, अर्थव्यवस्था इत्यादी गोष्टी अधिक सुकर होणार आहेत.
 प्रस्थापित कार्यपद्धतीत वर उल्लेखिलेल्या तिन्ही स्तरांवर शासन व संचालक या दोनच घटकांचे वर्चस्व आहे. एका अर्थाने प्रचलित खासगी संस्था, सरकारी १0 टक्के अनुदान लक्षात घेता शासकीय पैशावर व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासत आहेत. उद्योग, व्यापार क्षेत्रांतील व्यक्तिगत मक्तेदारीस पायबंद घालण्यासाठी आपण सार्वजनिक क्षेत्रे निर्माण केली, सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिले, तर मग शिक्षणक्षेत्रात अशा प्रकारे सामाजिक प्रतिनिधित्व प्रतिबिंबित करण्यात काय अडचण आहे? या ठिकाणी मला शिक्षण संस्था या सहकारी संस्था व्हाव्यात असे अपेक्षित नाही. प्रस्थापित व्यवस्थेत सर्व संबंधित घटकांचा समान सहभाग येथे अपेक्षित आहे. सामाजिक संस्था, संपत्ती, आदींचे संगोपन व संवर्धन जनतंत्रात्मक पद्धतीने सामाजिक घटकांद्वारा होणे अधिक श्रेयकर असते. अन्यथा व्यक्तिवादी प्रवृत्ती जोपासण्याचा कुटील व कुटीर उद्योग फोफावू लागेल,हे सुज्ञांना वेगळे सांगण्याची गरज नाही.

 लोकशाहीकरणाची संकल्पना समजून घेत असताना या प्रक्रियेत प्रत्येक घटकांचे स्थान, हक्क, कर्तव्ये, जबाबदा-या स्पष्ट होणे निकडीचे आहे. या प्रक्रियेत विद्यार्थी हा केंद्रबिंदू असून बाकी सर्व घटक हे त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी कार्यरत असतील. असे असले तरी विद्यार्थी या घटकासही या प्रक्रियेत प्रतिनिधित्व असेल. प्राथमिक व माध्यमिक स्तरांवरील संस्थेत विद्यार्थी कल्याणकारी संस्था त्याचे प्रतिनिधित्व करतील, तर महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थी स्वतःच प्रतिनिधित्व करतील. या संकल्पनेत शिक्षकाने सर्वाधिक क्रियाशील घटक म्हणून कार्य करणे अपेक्षित आहे. या परिवर्तनात त्याची सुरक्षितता जशी वाढेल तशीच त्याची जबाबदारीही वाढणार आहे. शिक्षक हा घटक या मदतीत कितपत क्रियाशील व जागृत राहतो यावरच या परिवर्तनाचे स्थैर्य अवलंबून आहे. या परिवर्तनात त्याला आपल्या कल्पना,

एकविसाव्या शतकातील शिक्षण/३१