पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 या युगाचे शिक्षण प्रश्न सोडविणारे राहणार असल्यानं ते प्रकल्पाधारित (Project Based) असेल. स्मरणशक्तीपेक्षा समज विकसित करणारं हे शिक्षण प्रश्नांना सामोरे जाणारे असेल. म्हणून त्यात प्रकल्पांवर भर दिला जाईल. प्रश्न, त्याची पूर्वपीठिका, त्याचे वर्तमान स्वरूप, ते सोडविण्याचे उपाय असे बहुआयामी शिक्षण एकाच वेळी विचारी, कृतिशील, कल्पनेस चालना देणारे, ज्ञानाची नवी मांडणी व निर्मिती करणारं राहणार असल्याने पारंपारिकतेस फाटा देऊन व्यक्ती प्रतिभेस आवाहन देणारे असेल.
सप्त जीवनकौशल्ये (Seven Survival Skills)
 एकविसाव्या शतकातील शिक्षणाचा संबंध जीवन जगण्याशी व परिस्थितीचा मुकाबला करीत तग धरून राहण्याशी असल्याने या शिक्षणाची सात जीवनकौशल्य निश्चित करण्यात आली आहेत. खरं तर ती या शिक्षणाची उद्दिष्टं (objectives) म्हणूनही स्वीकारणे योग्य ठरेल.
१. जीवनाचा साधक-बाधक असा विवेकी विचार व प्रश्न सोडविण्याचे सामर्थ्य.
२. सर्व संपर्कसाधने व माध्यमांशी सुसंवाद व त्यांच्या प्रभावानुषंगिक शिक्षण.
३. लवचिकता व स्वीकारार्हता.
४. नेतृत्व व उद्योजकता विकास.
५. मौखिक व लिखित संवाद आणि संपर्ककौशल्य. (संभाषण कौशल्य व लेखनप्रतिभा)
६. माहितीचे आकलन व विश्लेषण.
७. जिज्ञासा व कल्पकता.

 वरील कौशल्य विकासाचे शिवधनुष्य पेलायचे असेल तर वर्तमान, पारंपरिक शिक्षणास छेद देणे ओघाने आलेच; त्यामुळे एकविसाव्या शतकाचे शिक्षण माहिती व तंत्रज्ञान पेलणारी वैश्विक पिढी निर्माण करणारे राहील. येथील विद्यार्थी कुणा एका गावचे, राज्य वा राष्ट्राचे राहणार नाहीत तर ते महाजालीय व्यवस्थेचे घटक (Digital Native) असतील, तर शिक्षक विश्वसंचारी (Digital Immigrants) असतील; म्हणजे मुले व शिक्षक आपल्या स्थळी राहून (घरी, गावी) शिकू अथवा शिकवू शकतील. शिक्षणाचं एक नवे क्षितिज तयार झाले असून ते माध्यमसंस्कृतीचे जग म्हणून विकसित झाले आहे.

एकविसाव्या शतकातील शिक्षण/१२२