पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

क्लासबोर्ड, टचस्क्रीन आले आहेत. जगातील शिक्षण कागद, पेन्सिल, खडू, फळा, डस्टर, पुस्तक, वही, रंगपेटी, कंपासमुक्त होऊन ऑनलाईन, व्हर्म्युअल, संगणकीकृत झाले आहे. जगातल्या प्रगत बालवाडीला दप्तर नाही, पुस्तक नाही, पेन नाही. आहे ते सारे लॅपटॉप, पामटॉप, सिंम्प्युटरवर. हे आपण केव्हा समजून घेणार? जगातलं शिक्षण आता शाळा, शिक्षक, साधनमुक्त होऊन ते ‘आभासी ज्ञानरंजन शिक्षण' (Virtual Infoternment Education) झाले आहे. ते जिज्ञासा म्हणून आज समजून घेतले तर कदाचित उद्या आपणास आपल्या मागासपणाची शरम राहणार नाही व आपण आपले शिक्षण एकविसाव्या शतकातील नव्या पिढीच्या प्रश्न व आवाहनांना समजून घेऊन देत गेलो तर निदान आधुनिक ज्ञान समाज (Modern Knowledge Society) निर्मितीचे तरी समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही.
एकविसाव्या शतकातील शिक्षण
 एकविसाव्या शतकातील शिक्षण हे संदर्भ शिक्षण आहे. ते ज्ञान देण्यापेक्षा ज्ञानविकास, निर्मिती व उपयोगावर भर देते. आजच्या जगातील शिक्षणात कोणताही विषय स्वतंत्र व स्वायत्तपणे शिकविला जात नाही. उदाहरणार्थ भाषा विषय घेतला तर केवळ मराठी न शिकविता त्या संदर्भात हिंदी, इंग्रजी भाषांचे ज्ञान देणे आवश्यक असते. भाषेचा अभ्यास पण केवळ भाषा म्हणून न करता तो संस्कृती, कला, समाज अशा अंगांनी कसा करता येईल हे पाहिले जातं. आज शिक्षण हे केवळ नोकरी व उपजीविकेचे साधन म्हणून न पाहता ते जीवन जगण्याचे कौशल्य (Life skill) म्हणून पाहिले जाते. त्यामुळे प्रत्येक विषय अन्य ज्ञानविज्ञानाला जोडून शिकविण्यावर भर देण्यात येतो. यालाच शिक्षणाचा आंतरशाखीय दृष्टिकोन (Interdisciplinary Approach) मानण्यात येतं.

 नव्या शिक्षणात एकात्मिकतेवर भर देण्यात आला आहे. ही एकात्मिकता अनेक अंगांनी जपण्याचा प्रयत्न केला जातो. सर्व मुले एकत्र शिकली तर त्यांचा विकास संतुलित होतो. हुशार, ढ, अपंग, अंध असे वर्ग विभाजन न करता सर्वांना एकत्र शिकवणे जसे महत्त्वाचे तसेच विद्याथ्र्यास पूर्ण विकसित करणंही तितकंच महत्त्वाचे. केवळ बौद्धिक क्षमता विकास म्हणजे शिक्षण नव्हे; तर त्याचा सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक, भावनिक विकासही तितकाच महत्त्वाचा. नोकरीस तयार करणं व माणसास पैसे मिळवण्याचे यंत्र बनवणे हे या नव्या शतकाच्या शिक्षणाचे ध्येय राहणार नाही. विद्यार्थी हा ‘पूर्ण मानव' (Complete Human Being) बनविण्यावर शिक्षणाचा भर राहणार आहे.

एकविसाव्या शतकातील शिक्षण/१२१