पान:उषःकाल.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देऊनी विश्वास करताती घात
पुण्याचा नि:पात | तुझ्यापुढे ॥
  तुझी तरी काय वर्णावी थोरवी ?
  पुण्याई गौरवी । पाप्याची तू ॥
घेऊनी शपथ मारताती थाप
करताती पाप । राजरोस ।
  आशीर्वाद - शाप कसला ? कोठला ?
  बाजार लोटला | मतलबी ॥
चिमणीचे घर वणव्यात जळें
चाखताती तळे । मशालधारी ।।
  काय तुझी लीला म्हणावी गोविंदा
  सज्जनांची निंदा कानी येई ॥
तुझी वजाबाकी पाप पुण्याईची
भलतीच कच्ची । आहे देवा ॥
  उगा का लागतो संन्याशाला फास ?
  चोराला सुग्रास । पोटभर ॥
अमृताची नशा चढली तुला का ?
जीव हा पोरका | संभ्रमात ॥
  व्यर्थ जाणुनिया तुझ्या अस्तित्वास
  न्याय - सात्त्विकास । का विसरू ? ॥

उषःकाल । ३