पान:उषःकाल.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बंगला

वाळूत रंगला खेळ  खेळात संपला वेळ
कारागीर आम्ही सान  बंगले बांधिले छान
दगड, विटा अन् माती  कश्शाचीच जरूरी नव्हती
बांधिले किती सुंदरसे  वाळुचे इमले इवलेसे
पुळणीच्या वाळुवरती  नटली ती आमुची धरती
नयनांचे झाले शिंपले  बंगले पाहता आपुले
मोत्या परी जपले त्याते  वाळुचे जरी ते होते
अंधारुन जेव्हा आले  खेळगडी बावरुन गेले
पाखरे निघाली घरला  बाळांनी रस्ता धरला
हृदयांतरी मोठी आस  गुंतली नदीवर खास
माझाही होता सुरेख  बंगला किनारी एक
निघता सोडून तयाशी  दाटुनी आले गळयाशी
मनबाई भरूनी आले  जधी सोडुनी त्याशी आले
स्वप्नीच कितीदा दिसला  मनहारी माझा बंगला
पहाटेला जागी झाले  नदी काठी धावत आले
वाळुविन मजला काही  पुळणीवर दिसले नाही
कुणी दुष्टाने तुडविला  की तो विरून गेला ?
नाहीच उमजले बाई  बंगलाच दिसला नाही
तेजाळ विजेचे पान  मनी देऊन गेले भान


हातामधी स्फूर्ती होती वाळूही सरली नव्हती
त्यातूनच गमले मजला बांधीन पुन्हा मी बंगला!
उषःकाल । ४४