पान:इहवादी शासन.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पाश्चात्त्य देश । ८७
 

त्या नगरींत प्रवेश मिळतो व तेथेच त्यांना शाश्वत सुखाचा, मोक्षाच लाभ होतो. हें जग क्षणभंगुर आहे, पापमय आहे आणि येथील सुखाच्या मागे लागलेले लोक कायमचे नरकांत जातात. तेव्हा धर्मग्रंथ, धर्ममंदिरें व धर्मगुरु यांना शरण जाऊन प्रत्येकाने मोक्षसाधना करावी हेंच श्रेयस्कर होय. ख्रिस्ती धर्म समतेचें तत्त्व सांगतो. पण सेंट ऑगस्टाईन व त्याच्या आधीचे पीटर, पॉल इत्यादि धर्माचार्य हे गुलामगिरीचें समर्थनच करीत असत. माणसाचें आत्मिक जीवन हेंच त्यांच्या मतें महत्त्वाचें होय. गुलामगिरी ही बाह्य शरीराला जखडते. आत्म्याला नाही. शिवाय मनुष्याने केलेल्या पापाचें फळ म्हणुनच त्याच्या नशिबीं गुलामगिरी येते. असें ते म्हणत. अशा तऱ्हेच्या तत्त्वज्ञानामुळे ग्रीक संस्कृतींतील बुद्धिप्रामाण्य, प्रवृत्तिनिष्ठा, स्वातंत्र्यवृत्ति, राजकीय आकांक्षा या तत्त्वांचा हळूहळू लोप झाला. ग्रीक भाषा ही सुद्धा आता निंद्य ठरली. ग्रीक वाङ्मय पाखंडीपणा, नास्तिकवाद शिकवितें म्हणून धर्माचार्यांनी त्याचा अभ्यास निषिद्ध मानला. त्यामुळे हळूहळू तें विस्मृतीत जाऊन युरोपवर अंध धर्मश्रद्धेचा पगडा बसला. पोपच्या अनियंत्रित सत्तेचा तो पायाच ठरला. आपल्या सत्तेचें मंदिर त्यावर उभारून ऐहिक व पारमार्थिक ह्या दोन्ही क्षेत्रांवर तेथून पोप राज्य करूं लागला.
 सेंट ऑगस्टाईनच्या 'सिटी ऑफ गॉड' या ग्रंथांतूनच पवित्र रोमन साम्राज्याची कल्पना उद्भवली. प्रथम धर्मसत्ता व राजसत्ता या दोन तलवारी आहेत, असें मानले जात असे व त्यांचा कारभार स्वतंत्रपणें चालावा, असाहि विचार सांगितला जात असे. पण पोप ग्रेगरी सातवा याने तो पूर्णपणे मोडून काढला. त्यानंतर सेंट बर्नार्ड, जॉन ऑफ सॅलिसबरी व विशेषत: सेंट थॉमस् ॲक्विनास यांनी धर्मपीठाच्या अधिसत्तेचें आणि ग्रंथप्रामाण्य, मोक्षैकनिष्ठा, निवृत्ति या पूर्वाचार्यप्रणीत तत्त्वांचेंच समर्थन केलें व आपल्या प्रभावी वाणीने व लेखणीने त्याचा सर्व कॅथॉलिक जगतांत प्रसार केला. असा प्रसार करणें त्यांना फार सुलभ झालें याचें कारण असें की, सर्व युरोप त्या वेळीं पुन्हा रानटी अवस्थेला गेला होता. फ्रँक (हे मूळचे जर्मन), नार्समेन, स्लाव्ह हे सर्व रानटीच लोक होते आणि पूर्वेकडून आलेले व्हँडाल्, हिसिगॉथ, हूण हे त्यांच्यापेक्षाहि जास्त रानटी होते. त्या सर्वांनी मिळून ग्रीस व रोम यांचा पूर्ण नाश केला व सर्व युरोप वन्यावस्थेस नेऊन पोचविला. या वेळीं ख्रिस्ती धर्मपीठाने इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, रशिया या सर्व देशांत मिशनरी पाठवून तेथील राजांना ख्रिश्चन धर्माची दीक्षा दिली आणि त्यामुळे सहजच सर्व प्रजा ख्रिश्चन झाली. त्या वेळी पूर्व युरोपांत रोमन सम्राटांचें राज्य होतें. त्यांनी राज्यपदाबरोबरच धर्मपीठाचेंहि प्रभुत्व आपल्या हातीं घेतलें. पूर्वेकडे पुढील अनेक शतकें राजाच प्रमुख धर्माचार्य असे. पश्चिमेकडे राजसत्ता व धर्मसत्ता एक झाल्या, पण त्या