पान:इहवादी शासन.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८६ । इहवादी शासन
 

संस्थानिक त्यांची निवड करीत. ही निवड योग्य की अयोग्य हें पाहण्याचा व ती मंजूर वा नामंजूर करण्याचा हक्क आपला आहे, असा पोपचा दावा होता. सारांश, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय सर्व जीवनावर पोप अनियंत्रित, निरंकुश सत्ता चालवीत असे; आणि राजे व सर्व समाज ती मानीत असे. समाजाला यांत विपरीत असें कांही वाटत नसे. धर्मसत्ता हीच सर्वश्रेष्ठ होय, अशी त्या वेळीं पश्चिम युरोपांतील सर्व देशांतील लोकांची श्रद्धा होती. धर्मसत्ता ही परमेश्वराची सत्ता होय आणि पोप हा परमेश्वराचा या भूलोकावरचा प्रति- निधि होय, असें ते मानीत. त्यामुळे पोपच्या विरुद्ध स्वतःच्या राजांना ते पाठिंबा देत नसत. पोपवरची, धर्मपीठावरची त्यांची अंधश्रद्धा इतकी खोलवर जाऊन रुजली होती की, त्याच्या विरुद्ध जाण्याचें धैर्य त्यांच्या ठायीं निर्माण होणें शक्य नव्हतें. ती श्रद्धाच जेव्हा पुढे डळमळली तेव्हा पोपचें सामर्थ्य संपले. पण तो तेराव्या, चौदाव्या शतकांतला इतिहास आहे. अकराव्या-बाराव्या शतकांत तें शक्य नव्हतें. मागे ग्रीसच्या वैभवाच्या काळांत व नंतर रोमन साम्राज्यांत अशी धर्मश्रद्धा मुळीच नव्हती. त्यामुळे त्या वेळी लोक निर्भय असत, विवेकस्वातंत्र्याला आणि व्यक्तिस्वातंत्र्याला जपत आणि धर्माचार्यांना आपल्या ऐहिक व्यवहारांत हस्तक्षेप करू देत नसत. ख्रिस्ती धर्माच्या उदयानंतर या सर्व गुण- संपदेचा लोप झाला. ख्रिस्ती धर्मपीठाच्या मोठमोठ्या धर्माचार्यांनी व पंडितांनी त्या धर्माचें तत्त्वज्ञान पद्धतशीर प्रयत्नांनी लोकमानसांत रुजविलें आणि दीर्घ असें तमोयुग निर्माण केलें. तें तत्त्वज्ञान काय होतें व तें रुजविण्यासाठी कोणी कसे प्रयत्न केले तें पाहून, हें प्रास्ताविक विवेचन संपवू.

प्रवृत्तिनिष्ठेचा लोप

 सेंट ऑगस्टाईन (इ. स. २५४- ४३०) हा ख्रिश्चन धर्माचा सर्वांत मोठा भाष्यकार मानला जातो. रोमने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतरच त्याच्यावर रानटी लोकांचे हल्ले होऊन त्या नगरीचा व रोमन साम्राज्याचा अंत झाला. त्यामुळे लोकांची धर्मश्रद्धा डळमळली. आम्हीं ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्याचें हेंच का फळ, असें ते म्हणू लागले. लोकांच्या या शंकांचे निरसन करून ख्रिश्चन धर्माचें सर्व तत्त्वज्ञान सविस्तर मांडण्याचें कार्य सेंट ऑगस्टाईन याने केलें. 'सिटी ऑफ गॉड' हा त्याचा ग्रंथ या दृष्टीने फार श्रेष्ठ मानला जातो. जवळ जवळ एक हजार वर्षे म्हणजे इ. स. १२००- १३०० पर्यंत ख्रिश्चन समाजावर त्याचें अखंड वर्चस्व होते. या ग्रंथांत त्याने सांगितले की, रोमन साम्राज्य व तत्सम इतर साम्राज्ये म्हणजे भूनगरी होत. त्या सैतानाधीन असतात, पापमग्न असतात, त्यामुळे त्यांचे मरण अटळ आहे. खरें शाश्वत जीवन म्हणजे देवनगरीचें जीवन होय. ख्रिश्चन धर्माची एकनिष्ठ उपासना करणाऱ्या पुण्यात्म्यांनाच