पान:इहवादी शासन.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पाश्चात्त्य देश । ८५
 

त्यांच्या खजिन्यांत होतें. पोपजवळ स्वतःचें लष्कर मुळीच नव्हतें व प्रत्यक्ष सत्ताहि त्याच्या हातीं नव्हती. मग या राजे-महाराजांना नमविण्याचें सामर्थ्य त्याला कोठून प्राप्त झाले ? लोकांची धर्मश्रद्धा हें या प्रश्नाचे उत्तर आहे. पोपचा बहिष्कार हें शस्त्र यामुळेच अगदी अजिंक्य झालें होतें. पोपने देशावर व राजावर बहिष्कार पुकारला, की भटजी लग्ने लावणार नाहीत, बाप्तिस्मा देणार नाहीत, अंत्यविधीला येणार नाहीत, पापाची क्षमा करणार नाहीत आणि कोणत्याहि कार्याला आशीर्वाद देणार नाहीत. आजहि हे विधि झाले नाहीत, तर आपले प्रियजन नरकाला जातील, भूतपिशाच्च होऊन आपल्याला छळतील, त्यांच्यावर अनंत संकटें कोसळतील, देशांत साथीचे रोग पसरतील, भूकंप होतील, महापूर येतील, टोळधाडी येतील, अशी कांही प्रमाणांत तरी लोकांना भीति वाटतेच. मग त्या काळी पोपच्या बहिष्कारामुळे केवढा हाहाकार माजत असेल याची कल्पना सहज येईल. त्या बहिष्कारामुळे सर्व देशाला मसणवटीचें रूप येई आणि लोक भीतीने मृतवत् होऊन जात. आणि हें सर्व या राजाच्या धर्मनष्टपणामुळे होत आहे असें दिसून आल्यामुळे ते सर्व राजाच्या विरुद्ध उठत. राजाचें लष्करहि त्यांच्या अधीन राहत नसे. सरंजामदार, सरदारहि घाबरून जाऊन पोपला वश होत. पोप त्यांना चिथावून त्यांच्यांत बेदिली माजवी. इतर देशांच्या राजांना या बहिष्कृत देशावर स्वारी करण्याची आज्ञा तो देई. जॉन राजावर स्वारी करावी असा आदेश त्या वेळचा फ्रान्सचा राजा फिलिप याला पोपने दिला होता व त्यानेहि जंगी तयारी केली होती. म्हणजे राजे लोक असल्या आज्ञाहि निमूटपणें पाळीत असत. तेव्हा लोकांच्या मनांतील धर्मावरील अंधश्रद्धा हेंच पोपचें सामर्थ्य होतें.
 मागील विवेचनांत अनेक वेळा सांगितलें आहे कीं, केवळ शासन इहवादी होण्याला फारसा अर्थ नसतो. सर्व समाज इहवादी झाला तरच समाजाची प्रगति होते. शासनाने समाजाला इहवादी बनविण्याचा कायद्यांनी, प्रचाराने सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे, यांत शंकाच नाही. पण त्याचें फल म्हणून समाज अंधधर्मश्रद्धेतून मुक्त झाला तरच त्याच्या कर्तृत्वाची जोपासना होऊं शकते. अन्यथा समाज आणि त्यामुळे राजसत्ताहि दुर्बल व अकार्यक्षम होऊन बसते. जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड या देशांवर चालणारी पोपची अप्रतिहत सत्ता हें याचेंच प्रत्यंतर होय. पोपने पश्चिम युरोपच्या राजांना मांडलिकांच्याहि खालच्या पातळीवर नेऊन ठेवलें होतें. धर्माच्याच वाबतींत तो सत्ता चालवी असें नाही. दोन देशांच्या राजांच्यामध्ये तह किंवा करार हे आपल्याच संमतीने झाले पाहिजेत, राज्यांत होणाऱ्या सर्वच न्यायदानावर आपली देखरेख राहिली पाहिजे, विधवा, लहान मुलें यांच्या मिळकतीची देखभाल आपल्याला विचारून केली पाहिजे, असा त्यांचा दंडक होता. 'होली रोमन एंपायर'चे, पवित्र रोमन साम्राज्याचे, सम्राट् हे रोमन कधीच नव्हते. ते बहुधा सर्व जर्मन असत व जर्मनींतच राहत आणि जर्मनींतील सात