पान:इहवादी शासन.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८४ । इहवादी शासन
 

सत्ताधीश झाला आणि धार्मिक क्षेत्राप्रमाणेच राजकीय क्षेत्रांतहि तो वर्चस्व गाजवूं लागला. हिंदुस्थानांत व इतर पौर्वात्य देशांत धर्मपीठांचे लोकांवर वर्चस्व असले, तरी राजकीय शासनाप्रमाणे धर्माची शासकीय चौकट तेथे कधीच प्रस्थापित झालेली नव्हती व नाही. पण पश्चिम युरोपांत ख्रिस्ती धर्माच्या आचार्यांनी चौथ्या शतकापासून, राज्यसत्तेप्रमाणेच तालुका, जिल्हा, प्रांत, प्रदेश असे विभागवार अधिकारी नेमून राजकीय साम्राज्याप्रमाणेच दृढ असें धार्मिक साम्राज्य प्रस्थापित केलें होतें आणि राजकीय रोमन साम्राज्य लयाला गेल्यावर साहजिकच रोमपीठाचें धार्मिक साम्राज्य तशीच सत्ता गाजवू लागलें. तरी आठव्या शतकाच्या अखेरीपर्यंत पूर्वं रोमन साम्राज्याची सत्ता कांही अंशी तरी रोमवर चालत असे. इ. स. ८०० या सालीं पोप लिओ तिसरा याने ती झुगारून दिली. फ्रँक लोकांचा राजा शार्लमेन याला त्याने पवित्र रोमन सम्राट म्हणून अभिषेक केला आणि रोमन सम्राटांचा प्राचीन काळचा मुगुट त्याच्या मस्तकावर ठेवला. पश्चिमेकडचें 'होली रोमन एंपायर' या रीतीने जन्माला आल्यामुळे तें नित्य आपल्या अंकितच राहिलें पाहिजे, असा रोमच्या पोपचा दावा असे. पोपने अभिषेक केल्यावांचून कोणीहि पुरुष सम्राट् पदावर आरूढ होऊ शकणार नाही, असा दंडकच पोपने ठेवला. त्यामुळे हे रोमन सम्राट् त्याला नमून असत. त्यांनी कधी बंडावा केलाच, तर पोप त्यांच्यावर बहिष्कार पुकारीत असे आणि मग शरणागतीवांचून सम्राटांना दुसरें गत्यंतरच राहत नसे. सम्राट् चौथा हेन्री (१०७७) याने थोडी धिटाई करून पोपला पदच्युत करण्याचा घाट घातला. पण पोपने बहिष्कार पुकारून त्याला प्रत्युत्तर दिलें. तेव्हा नाक मुठीत धरून सम्राटाला पोपपुढे लोटांगण घालावें लागलें. क्षमा मागून तो पोपला भेटण्यासाठी रोमला गेला तेव्हा पोपने त्याला तीन दिवस उघड्यावर बर्फात उभे करून ठेवलें व नंतरच त्याला भेट दिली. इंग्लंडच्या जॉन राजाला (१२०८- १२१६) पोप इनोसंट तिसरा याने असेंच नमविलें. पश्चिम युरोपांतील जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड या सर्व देशांत धर्माचार्यांची नेमणूक करण्याचा अधिकार पोपचा आहे, त्या त्या देशांच्या राजाचा नाही, असा पोपचा दंडक होता. त्याचप्रमाणे धर्मगुरूंवर कर बसविण्याचा किंवा त्यांच्या हातून कांही गुन्हा घडला तर त्यांचा न्याय करण्याचाहि अधिकार राजांना नसून, त्यांच्यावर फक्त पोपची सत्ता चालते, असाहि त्याचा दावा होता. जर्मन (रोमन) सम्राट चौथा हेन्री आणि इंग्लंडचा जॉन यांना पोपचा हा दंडक मान्य नसल्यामुळेच हे संघर्ष उद्भवले होते; आणि दोन्ही वेळा विजय पोपचाच झाला.

धार्मिक अंधश्रद्धा

 येथे प्रश्न असा उद्भवतो की, पश्चिम युरोपचे हे राजे व सम्राट् शरणागति कां पत्करीत ? सत्ता त्यांच्या हातीं होती, सेना त्यांच्याजवळ होती, विपुल धन