पान:इहवादी शासन.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पाश्चात्त्य देश । ८३
 

विज्ञान या विद्यांचे धडे घेतले आणि अर्वाचीन युरोपीय संस्कृतीचा पाया घातला. या प्रबोधन युगांत जें इहवादाचें तत्त्वज्ञान सिद्ध झाले तेंच आज जगाने स्वीकारलें आहे. म्हणून तेराव्या शतकाला इहवादाचें प्रारंभयुग म्हणतात तें युक्तच असले तरी त्याचा मूळ प्रारंभ इ. स. पूर्व सहाव्या-सातव्या शतकांत ग्रीक भूमींत झाला होता है आपण विसरून चालणार नाही.

तमोयुद्धाला प्रारंभ

 ग्रीकांनंतर रोमनांचा उदय झाला. रोमन लोक ग्रीकांप्रमाणेच इहवादी होते, पण त्यांच्या काळांत इहवादाचीं नवीं तत्त्वें अशी कोणतीच प्रस्थापित झाली नाहीत; म्हणून रोमनांचा स्वतंत्र विचार करण्याचें कारण नाही. रोमन साम्राज्यांतच ख्रिस्ती धर्माचा उदय झाला. इसवी सनाच्या चौथ्या शतकांत त्याचा प्रभाव वाढू लागला. कॉन्स्टंटाईन या रोमन सम्राटाने त्या धर्माला प्रथम आश्रय दिला व इ. स. ३३७ सालीं स्वतः त्या धर्माची दीक्षा घेतली. यामुळे ख्रिस्ती धर्माचा झपाट्याने प्रसार होऊ लागला. पुढील कांही शतकांत फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी येथल्या राजांनी व त्यामुळेच प्रजेनेहि तो धर्म स्वीकारला आणि हळूहळू सर्व युरोप जीजसच्या कळपांत समाविष्ट झाला. आज युरोप ख्रिस्ती असूनहि ऐहिक वैभवाच्या व संस्कृतीच्या शिखरावर आहे; पण त्याचें श्रेय वर सांगितलेल्या प्रबोधनयुगाला– त्यांतील ग्रीक विद्येच्या पुनरुज्जीवनाला आहे, प्रारंभीच्या ख्रिस्ती धर्माला नाही. त्या वेळी तो धर्म पराकाष्ठेचा अंधसिद्धान्तवादी आणि त्यामुळे तितकाच असहिष्णु होता. बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य, वैभवाकांक्षा, जीवनानंद, विवेकनिष्ठा हीं इहवादाचीं तत्त्वें त्याला मुळीच मान्य नव्हती. मानव हा मुळांत पतित आहे, पापी आहे, अधोगामी आहे, अशी त्यांची श्रद्धा होती. त्यामुळे हाती सत्ता येतांच त्याने ग्रीक व रोमन संस्कृतीचा समूळ नाश करून टाकला. अर्थात् इहवाद त्याबरोबरच विलयास गेला. युरोपच्या इतिहासांतील तमोयुगास तेथूनच, पांचव्या शतकापासूनच, प्रारंभ होतो. हें तमोयुग तेराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत चालू होते आणि ज्या ग्रीक विद्येचा ख्रिस्ती धर्माने नाश केला होता तिची उपासना करण्यास त्याने प्रारंभ केला तेव्हाच त्या तमोयुगांतून युरोप मुक्त झाला.
 रोमन सम्राट् कॉन्स्टंटाईन याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि त्याने आपली राजधानी रोमहून पूर्वेकडील कॉन्स्टांटिनोपल या शहरी नेली. त्या वेळी, त्याने रोमच्या बिशपला धर्मक्षेत्रांतील सर्वाधिकारी म्हणून मान्यता दिली. पुढे त्याच्या नंतरचे सम्राट् दुर्बळ निघाले; त्यामुळे रोमच्या बिशपची सत्ता वाढू लागली. पुढील शतकांत जर्मन व हूण ह्या रानटी टोळ्यांनी पश्चिम रोमन साम्राज्य नष्ट करून टाकल्यावर तर पश्चिमेला रोमचा बिशप हा अनियंत्रित