पान:इहवादी शासन.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२ । इहवादी शासन
 

वाढून दिवसेंदिवस ऐहिक जीवनावरील पोपच्या धर्मपीठाची सत्ता कमी होऊं लागली. तेरावें शतक म्हणजे इहवादाच्या प्रारंभाचें युग असें म्हणतात तें यासाठी.

ग्रीक विद्येचा वारसा

 पण पश्चिम युरोपांतील इहवादाचें रूप पाहण्याआधी आपल्याला कांही शतकें मागे गेलें पाहिजे. कारण त्या तत्त्वांचा उदय या शतकांत पश्चिम युरोपांत नव्याने होत असला, तरी युरोपला तें तत्त्व सर्वस्वीं नवीन होतें असें नाही. ग्रीक विद्येच्या पुनरुज्जीवनामुळेच तेराव्या शतकांत पश्चिम युरोपांत इहवादाचा उदय होत होता किंवा त्याचेंहि पुनरुज्जीवन होत होतें, असें म्हणणेंच योग्य होईल. कारण ग्रीक लोक हे पूर्णपणें इहवादी होते. फिशर या इतिहासवेत्त्याच्या मतें ग्रीक महाकवि होमर (इ. स. पूर्व ८ वे शतक) याच्या इलियड या महाकाव्यांतच अर्वाचीन युरोपच्या इहवादी तत्त्वज्ञानाची बीजें सापडतात. मानवत्वाची प्रतिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्य, आनंदी वृत्ति, प्रबळ जिज्ञासा, ऐहिक आकांक्षा हीं तीं बीजें होत. ग्रीक हे अधार्मिक नव्हते. धर्मनिष्ठ होते. पण संघटित पुरोहितवर्गाच्या सत्तेची त्यांच्या जीवनावर जखडबंदी कधीच नव्हती. ग्रीकांनी ग्रंथप्रामाण्य कधीच स्वीकारले नाही, आणि राजकारणांत धर्माचा हस्तक्षेपहि कधी होऊ दिला नाही. ग्रीक नगरराज्यांत आपसांत नित्य लढाया होत, पण तीं धर्मयुद्धे नव्हती. वैभव, वर्चस्व, स्वातंत्र्य यांसाठी तीं युद्धे होत. ग्रीक हे पराकाष्ठेचे समूहजीवनवादी होते. राजकीय प्रबुद्धता त्यांच्यांत कळसाला गेली होती, हें एकच प्रमाण त्यांचा इहवाद सिद्ध करण्यास पुरेसें आहे. लोकसत्ता, महाजनसत्ता, एकसत्ता अशा सर्व प्रकारच्या राजकीय संस्थांचे ते प्रयोग करीत, त्यांवर चर्चा करीत. प्लेटो, ॲरिस्टॉटलसारखे थोर पुरुष त्यांवर ग्रंथ लिहीत आणि पेरिक्लिजसारखे नेते राजनीतीचीं तत्त्वें प्रत्यक्ष व्यवहारांत आणीत. हें तीव्र इहनिष्ठेवांचून कदापि शक्य झालें नसतें. सॉक्रेटिस हा एक महापुरुष सर्व पाश्चात्त्य संस्कृतीचें प्रतीक म्हणून आपल्यापुढे उभा आहे. बुद्धिस्वातंत्र्य, विवेकनिष्ठा हा इहवादाचा आत्मा होय. त्या तत्त्वावर त्याची इतकी दृढ श्रद्धा होती की, त्यासाठी त्याने देहदंड पत्करला. बुद्धिप्रामाण्य हें सर्व मानवी कर्तृत्वाचें मूळ आहे, हें मागे अनेक वेळा सांगितलें आहे. ग्रीक संस्कृतीचें तें आद्य तत्त्व होतें. त्यामुळेच ग्रीकांचें भौगोलिक क्षेत्र फार मर्यादित असूनहि त्यांनी सर्व क्षेत्रांत कर्तृत्वाची परिसीमा गाठली होती. ॲनास्कागोरस, पायथागोरस, युक्लिड, सॉक्रेटिस, हिरोडोटस्, हिपॉक्रेटीस, थुसिडायडीज, डेमॉस्थेनीस, प्लेटो, ॲरिस्टॉटल, युरिपायडीस, ॲरिस्टॉफेनीस, गॅलन, आर्किमिडीज, अर्कोटस्, अपोलोनियस ही नाममालिका आजहि जगाला भूषणभूत होऊन राहिली आहे. ग्रीक विद्येचें पश्चिम युरोपांत पुनरुज्जीवन झाले तेव्हा त्या वेळच्या नेत्यांनी याच थोर पुरुषांपासून गणित, ज्योतिष, वैद्यक, इतिहास, राजनिति, रसायन, वनस्पतिशास्त्र, पदार्थ-