पान:इहवादी शासन.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



पाश्चात्त्य देशांतील
इहवादी शासन




 गेल्या दोन प्रकरणांत कम्युनिस्ट देशांतील इहवाद व मुस्लिम देशांतील इहवाद यांचें विवेचन केलें. आता इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली इत्यादि पाश्चात्त्य देशांतील इहवादी शासनांचा विचार करावयाचा आहे. इहवादाच्या विवेचनांत पश्चिमेंतील इहवादाच्या विवेचनाला फार महत्त्वाचें स्थान देणें आवश्यक आहे. कारण इहवादाचें तें आदिपीठ आहे. बुद्धिप्रामाण्य, सर्वधर्मसमानत्व, प्रवृत्तिपरता, ऐहिक उत्कर्षाची आकांक्षा, धर्मवर्चस्वांतून शासनाची व सर्व जीवनाची मुक्तता इत्यादि इहवादाचीं जीं तत्त्वें आज जगमान्य झाली आहेत तीं जगांतील बहुतेक सर्व देशांनी वर निर्देशिलेल्या पाश्चात्त्य देशांकडूनच घेतलेली आहेत. म्हणून पश्चिम युरोपांत या तत्त्वांचा उदय व विकास कसा झाला, केव्हा झाला, त्यांचा पुरस्कार करणारे तत्त्ववेत्ते व पंडित कोण होते, कोणत्या परिस्थितींत इहवादी तत्त्वज्ञानाची त्यांनी प्रस्थापना केली, त्यांनी त्या वेळीं प्रस्थापिलेल्या इहवादाचें नेमके स्वरूप काय होतें इत्यादि प्रश्नांची चर्चा भारताच्या दृष्टीने निश्चितच उद्बोधक होईल. म्हणून भारतांतील इहवादाची चर्चा करण्याआधी या पाश्चात्त्य इहावादाची चर्चा करण्याचें योजिलें आहे.
 या इहवादाचा उदय प्रामुख्याने तेराव्या शतकांत झाला. त्याच्या आधी शे-दोनशे वर्षे या स्वरूपाचें तत्त्वज्ञान मांडण्यांत येत होतें. त्याविषयी चर्चाहि होत होती. पण रोमच्या धर्मपीठावर त्या वेळीं इनोसंट तिसरा (११७८- १२१६), ग्रेगरी नववा (१२२७- १२४१) व इनोसंट चौथा (१२४३- १२५४) असे एकापाठोपाठ एक समर्थ पोप आल्यामुळे इहवादी पक्षाचा प्रभाव पडूं शकला नाही. पण तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात मार्सिलिओ, विल्यम् ऑफ् ओखॅम, पियरी डुवाईस, डांटे असे थोर तत्त्ववेत्ते इहवादाच्या समर्थनार्थ उभे राहिले आणि त्याच वेळी इंग्लंडचा पहिला एडवर्ड, फ्रान्सचा फिलीप दि फेअर व जर्मनीचा फ्रेडरिक दि ग्रेट दुसरा, असे पराक्रमी राजेहि पोपच्या वर्चस्वाविरुद्ध उभे ठाकले. त्यामुळे इहवादी पक्षाचें बळ
 इ. शा. ६