पान:इहवादी शासन.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८० । इहवादी शासन
 

मग कोणतें वचन खरें मानावें, असा प्रश्न येतो. त्याला उत्तरोत्तर प्रामाण्य असें मौलवींचें उत्तर आहे, पण तें जमत नाही. कारण कुराणांतले सर्व सुरे (अध्याय) व आयते (श्लोक) हे कालक्रमाने रचलेले नाहीत. पैगंबर प्रथम मक्केला होते. नंतर मदिनेला गेले. पण पवित्र कुराणांत मदिनेच्या सुऱ्यानंतर पुष्कळ मक्केचे सुरे सापडतात ! वर एके ठिकाणीं सांगितलेच आहे की, आपण मूळ अरबी आहों, असे दाखविण्यासाठी अनेक घराण्यांनी पैगंबरांच्या तोंडीं नवीन वचनें घातलीं आहेत, असें आज इतिहाससंशोधक सांगतात. पैगंबरांच्या चरित्रकारांनी जीं वचनें त्यांची म्हणून दिली आहेत, तीं सर्वत्र सारखी नाहीत. कुराण व सुन्ना यांच्या आधारें शरीयत हा कायदा झाला. पण त्यावर चार पंडितांनी वेगळी चार भाष्यें केलीं आहेत. शिवाय पुढे अनेक सुलतानांनी जे फतवे काढले तेहि त्यांत समाविष्ट केलेले आहेत. तेव्हा शरीयत हा कायदा सर्वस्वी पैगंबरांच्या आधारेंच उभा आहे असें नाही. शिवाय वेळोवेळी असे प्रसंग निर्माण होतात की, त्या वेळी शरीयतप्रमाणे वागणें अशक्य होऊन बसतें. व्याज, समता, चोरीची शिक्षा यांसंबंधीची उदाहरणें वर दिलीच आहेत. स्वेन लेव्ही याने 'सोशल स्ट्रक्चर ऑफ् इस्लाम' या आपल्या ग्रंथांत 'यूसेज्, कस्टम अँड सेक्युलर लॉ अंडर इस्लाम' या प्रकरणांत याची विपुल उदाहरणें दिली आहेत. राज्यकारभार, व्यापार, समाजनियंत्रण या क्षेत्रांत पावलोपावली शरीयत हा कायदा बाजूला ठेवावा लागलेला आहे. 'इव्हेजन्स ऑफ् लॉ' असें एक कलमच त्याने या प्रकरणांत घातलेले आहे. हें सर्व पाहतां इजिप्तचा मुस्ताफा कामील (अथवा केमाल) व अली अब्दुल रझेक यांनी सांगितल्याप्रमाणे इस्लामची मूलतत्त्वें फक्त स्वीकारून त्यांच्या आधारे प्रत्येक काळच्या समाजाने आपली प्रज्ञा, बुद्धि, चिंतन, अवलोकन, अनुभव, इतिहास, तर्क, यांच्या साह्याने आपापल्या जीवनाचें नियंत्रण करावे हाच उत्कर्षाचा खरा मार्ग होय. मुस्लिम देशांतील बहुतेक सर्व शासनांनी हा इहवादाचा मार्गच अनुसरण्याचें ठरविलें आहे, हें स्पष्ट आहे.
 आता तेथील मध्यमवर्गीय पंडितांनी वरील ऐतिहासिक चिकित्सेच्या आधारें इहवादाचीं हीं तत्त्वें समाजाच्या सर्व थरांपर्यंत पोचविली व तेथे रुजविलीं तर मुस्लिम विश्वाच्या प्रगतीला फार विलंब लागणार नाही. कोणत्या देशांतील बुद्धिवादी नेते किती निकडीने हें कार्य करतात त्यावर त्या देशाचे भवितव्य अवलंबून आहे. आज त्या देशांत पुन्हा प्रतिगामी विचारांची लाट आली आहे, असे दिसतें. इस्रायलने त्यांचा पराभव केला. त्यामुळे आपण इहवादी झालों म्हणून हे अपयश आलें असें तेथील मुल्ला-मौलवी सांगू लागले आहेत. तेथील तरुण नेते व जनता यांच्यावर या विचरांचा पगडा बसला, तर त्या देशांची प्रगति खुंटण्याचा संभव आहे. पण बहुधा तसे होणार नाही अशी आशा करूं या.