पान:इहवादी शासन.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुस्लिम देश । ७९
 

आणि हें सर्व कर्जबाजारी न होतां किंवा चलनवाढ न करतां या तुलनेने पाहतां इतर मुस्लिम देश अजून मागासलेले आहेत. शेतीच्या उत्पादनांत तुर्कस्थान- ६, इजिप्त, इराक, सिरिया- ३.५ आणि इराण- १.७ असें प्रमाण आहे. मला वाटतें इहवादाच्या प्रगतीचा व तज्जन्य कर्तृत्वाचा हिशेबहि याच प्रमाणांत निघेल. सौदी अरेबिया, जॉर्डन, येमेन हे देश अजून इहवादांत व म्हणूनच कर्तृत्वांत खूपच मागे आहेत. तेथे पाश्चात्त्य विद्या बऱ्याच उशिरा पोचली, हें त्याचें कारण आहे.
 इहवादाचा व मानवी कर्तृत्वाचा विचार करतांना आपण एक ध्रुवतारा अविचल दृष्टीने समोर ठेवला पाहिजे. पाश्चात्त्य देशांत गेल्या शंभर वर्षांत आइन्स्टाइन, ऑलिव्हर लॉज, एडिंग्टन, पाश्चर, मेरी क्युरी, सिग्मंड फ्रॉइड, विल्यम् जेम्स, जॉन स्टुअर्ट मिल, बर्ट्रांड रसेल, शॉ, गाल्सवर्दी, अप्टन सिंक्लेअर, झोला, ह्यूगो, रूझवेल्ट, चर्चिल, लेनिन, स्टॅलिन, वर्गसन्, सांतायन, टॉलस्टॉय, गॉर्गी, हेन्री फोर्ड, रॉकफेलर, क्रप, पॉल म्युनी, साहरा बर्नहार्ट असे थोर स्त्री-पुरुष निर्माण झाले. कोणत्याहि देशाच्या कर्तृत्वाचे मापन करतांना हा मानदंड नेहमी पुढे ठेवला पाहिजे. त्याने मोजून पाहतां या मुस्लिम देशांत त्या तोडीचा, केमालपाशा हा अपवाद वगळतां एकहि पुरुष झालेला नाही. दर पिढीला असा एखादा तरी पुरुष निर्माण होत राहिला तरच राष्ट्र प्रगतिपथावर आहे, असें म्हणतां येईल. तें फळ मिळावयाचें तर बुद्धिस्वातंत्र्य, व्यक्तिवाद, राष्ट्रनिष्ठा, स्वतंत्र अवलोकन, चिंतन, समता, मानवत्वाची प्रतिष्ठा या तत्त्वांचा म्हणजेच इहवादाचा अवलंब करणें हाच उपाय आहे. मुस्लिम देशांत आज त्या दिशेने मार्गदर्शक्रमण चालू आहे. पण वरील मानदंडाने मोजतां अजून ध्येयबिंदु फार दूर आहे, असें दिसून येईल.

चिकित्सक दृष्टीची गरज

 त्या बिंदूच्या जवळ जाण्याची आकांक्षा असेल, तर वरील देशांतील जनतेने आपले पूर्वग्रह, अंधश्रद्धा, रूढिनिष्ठा यांचा त्याग करून, ऐतिहासिक चिकित्सक दृष्टीने इस्लामकडे पाहावयास शिकलें पाहिजे आणि त्यांतील शुद्ध सुवर्ण तेवढे ठेवून बाकीचें हीण काढून टाकण्याचे मनःसामर्थ्यं प्राप्त करून घेतलें पाहिजे. तें प्राप्त झालें तरच श्रद्धा कशावर ठेवावी व कशावर ठेवू नये हें त्यांना सहज उमगेल. परमेश्वराने, अल्लाने महंमदाच्या तोंडून कुराण वदविलें आणि पुढे इस्लामचें धर्मशास्त्र तें कुराण, महंमदाचें चरित्र व त्याची स्वतःचीं वचनें म्हणजेच सुन्ना या आधारें रचलें आहे, अशी सर्व मुस्लिमांची श्रद्धा आहे. ही श्रद्धाच माणसाला बळ देते, त्याच्या उत्कर्षाला कारण होते, हें खरें पण तिला विवेकाची, ऐतिहासिक चिकित्सेची जोड दिली नाही, तर त्या मूळ तत्त्वावर साचलेले थरहि, इतरांनी त्याचे केलेले विपर्यस्त अर्थहि माणूस त्याच श्रद्धेने सुवर्ण म्हणून स्वीकारूं लागतो व मग त्याची प्रज्ञा झाकाळून जाते. कुराणात कांही विसंगती आहेत.