पान:इहवादी शासन.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८ । इहवादी शासन
 

अरबीपाशा, (इजिप्तचा) केमाल अथवा कामीलपाशा, सौदी अरेबियाचा फैजल, इराणचा झगलूलपाशा, तुर्कस्थानचा केमालपाशा, इजिप्तचा अब्दुल नासर हे सर्व या नव्या इहवादी विद्येचे व शिक्षणाचे भोक्ते व पुरस्कर्ते आहेत. त्यांनी सर्व शिक्षण उलेमांच्या हातून काढून घेऊन शासनाच्या नियंत्रणाखाली आणले आहे. उलेमांनी स्वतंत्रपणे धर्मशिक्षण देण्यास त्यांची हरकत नाही, पण त्या- वरहि यांचे कडक नियंत्रण असावें, नवीन निर्माण झालेल्या राष्ट्रशक्तीला पोषक असेंच धर्मशिक्षण उलेमांनी दिले पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष आहे.
 भारतांत १८७१ सालीं नेमलेल्या हंटर कमिशनचे अध्यक्ष सर विल्यम् हंटर यांनी इहवादी शिक्षण व कर्तृत्व यांचा संबंध स्पष्ट केला आहे. ते म्हणतात, हिंदुस्थानांत उच्च सरकारी अधिकारपदें व उच्च व्यवसाय यांत मुस्लिम अभावाने दिसतात याचें कारण असें की, सरकार जें शिक्षण देतें तें मुस्लिम परंपरेच्या, धर्माच्या विरुद्ध आहे, त्यांना घातक आहे, असें मुस्लिमांना वाटतें. हिंदूंनी तें शिक्षण घेतल्यामुळे त्यांचीं अनेक शतकांची झोप जाऊन त्यांच्यांत राष्ट्रनिष्ठेच्या उदात्त प्रेरणा निर्माण झाल्या आहेत. पण मुस्लिमांनी तें शिक्षण इहवादी असल्यामुळे निषिद्ध ठरविले आहे. (मुस्लिमांच्या मागासलेपणाचें हें कारण आहे.– रोझेंथॉल, पृष्ठ १९०). त्यानंतर सर सय्यद अहंमद यांनी जुनी शिक्षणपद्धति त्याज्य ठरवून पाश्चात्त्य विद्येचा जोराने पुरस्कार केला. जुन्या पद्धतींत बुद्धिस्वातंत्र्य नाही, हेंच कारण त्यांनी दिलें आहे. आज मुस्लिम देशांतील नेत्यांची हीच विचारसरणी आहे. म्हणून बुद्धीचा विकास घडवून आणणारी पाश्चात्त्य विद्याच ते स्वदेशांत प्रसृत करीत आहेत.

तुर्कस्थानची आघाडी

 आणि तिचीं फळेंहि त्यांना दिसूं लागलीं आहेत. आज त्या देशांत राष्ट्रीयत्वाचा पाया घातला गेला आहे. ते सर्व देश आज पारतंत्र्यांतून मुक्त झाले आहेत व आपले स्वातंत्र्य टिकविण्याइतकें कर्तृत्व त्यांच्या ठायीं निर्माण झाले आहे. लोकशाहीचे विचार त्या देशांत अगदी थोड्या प्रमाणांत का होईना, रुजत आहेत. तुर्कस्थानांत १९५० साली निवडणुका झाल्या. तेव्हा सत्तावीस वर्षे सत्तारूढ असलेला रिपब्लिकन पक्ष पदच्युत झाला व डेमोक्रॅट पक्ष अधिकारावर आला. त्याचें वर्णन करतांना कोलंबिया विद्यापीठाचे अर्नेस्ट जॅक म्हणतात, 'शांततेच्या मार्गाने विकास घडवून आणण्याचें हें तुर्कांचें सामर्थ्य जवळ जवळ अँग्लो-सॅक्सन लोकांसारखेंच आहे.' तुर्कस्थान आज औद्योगिक व शेतीविषयक क्रांतीच्या दृष्टीनेहि असाच आघाडीवर आहे. इतके दिवस धान्य आयात करणारा हा देश आता धान्य निर्यात करू लागला आहे. त्याने आपली एकंदर निर्यात १९५० ते १९५६ या सहा वर्षांत ९० टक्क्यांनी वाढविली आहे.