पान:इहवादी शासन.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुस्लिम देश । ७७
 

मौलिक संशोधन करूं शकले. पुढे ही निर्लेप उदारबुद्धि नष्ट झाली व जॉर्ज सार्टन् यांनी म्हटल्याप्रमाणे, धर्मसत्तेच्या अंध आग्रहामुळे अरब-विद्या ऱ्हास पावली. तेव्हा इहवादी बुद्धिप्रामाण्याच्या वातावरणांतच मानवी कर्तृत्वाचा, विकास होतो हें निर्विवाद होय.
 'दि सोशल स्ट्रक्चर ऑफ इस्लाम' या आपल्या ग्रंथांत स्वेन लेव्ही याने हेंच मत मांडलें आहे (पृ. ४५९), तो म्हणतो की, "कुराणांत जगांतलें सर्व ज्ञान आहे व कुराणांतील ज्ञानाने पूर्वीच्या सर्व ज्ञानाचा निरास होतो, हें मत उत्तरकालीन आहे. कोणी म्हणतात की, खलिफा उमर याने अलेक्झांड्रिया शहर जिंकलें तेव्हा त्याने तेथील प्रचंड ग्रंथालय जाळून टाकलें आणि कारण असें दिलें की, "या ग्रंथांतील ज्ञान कुराणांतलेंच असेल, तर त्यांचा कांही उपयोग नाही व कुराणाहून भिन्न असेल, तर तें त्याज्यच होय." लेव्हीच्या मतें ही केवळ दंतकथा होय. कारण असें असतें तर अरबांनी ॲरिस्टॉटल, प्लेटो, युक्लिड, हिपॉक्रीटस्, हिरोडोटस् या ग्रीक ग्रंथकारांच्या ग्रंथांचीं भाषांतरें केलींच नसती. कारण तें सर्व कुराणबाह्य ज्ञान होतें. असा हा साधारण पांचशे वर्षांचा कर्तृत्वाचा काळ गेल्यानंतर पुढे अंधारयुग सुरू झालें. चौदाव्या शतकांत अरब इराणी यांच्या हातांतील सत्ता तुर्क लोकांच्या हातीं गेली. त्यांनी मोरोक्कोपासून इराकपर्यंत फार प्रचंड साम्राज्य स्थापन केलें. त्यांत पहिली दोन शतकें महंमद, मुराद, सेलीम, सुलेमान यांसारखे अत्यंत कर्तबगार असे पादशहा होऊन गेले. पण गणित, रसायन आदि भौतिक विद्या, इतिहास- भुगोल इत्यादि सामाजिक शास्त्रे व साहित्य आणि कला यांच्या दृष्टीने त्यांच्या काळीं कांहीच निष्पत्ति झाली नाही. एच्. ए. एल. फिशर हा विख्यात इतिहासकार म्हणतो, "तुर्क साम्राज्यांत प्रजेला स्वतंत्र विचार वर्ज्य होते. या साम्राज्यांत बगदाद समाविष्ट झाल्यानंतर त्या नगरीच्या वैभवाचा लोप झाला. कारण त्या वैभवापर्यंत जाऊन पोचण्यास तुर्की प्रज्ञा असमर्थ होती." (ए हिस्टरी ऑफ युरोप, पृष्ठ ४९३).
 तुर्की साम्राज्य व त्यांतील मुस्लिम देश हे जवळ जवळ सहा-सातशे वर्षे अंधार- युगांत होते. त्या अंधारांत प्रथम नेपोलियनच्या वेळी व पुढे मग गेल्या शतकाच्या अखेरीस इंग्रज, फ्रेंच या आक्रमकांच्या बरोबर, पाश्चात्त्य विद्या आली त्या वेळीं थोडीं प्रकाशकिरणें दिसूं लागलीं. इजिप्त, सिरिया, तुर्कस्थान या देशांत तीं लवकर पोचलीं आणि राहिलेल्या देशांत ती पोचल्याला अजून पावशतकहि झालेलें नाही. पण आज शिक्षण सार्वत्रिक व सक्तीचें करून ती विद्या समाजाच्या सर्व थरांपर्यंत पोचवावयाची, असा सर्व मुस्लिम देशांतील शास्त्यांचा व नेत्यांचा कृतनिश्चिय झाला आहे. तेथील शाळा- महाशाळांतून भौतिक विद्यांचें शिक्षण दिलें जातें. आणि त्यांतूनच सध्याचा बुद्धिवादी, विद्यासंपन्न असा मध्यमवर्ग निर्माण झाला आहे. मागे एके ठिकाणीं सांगितल्याप्रमाणे मुस्लिम देशांचे आजचे सर्व नेते या मध्यमवर्गातूनच आलेले आहेत.