पान:इहवादी शासन.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इहवादी शासन । सात
 

आज भारतावर १९६५ सालाचीच आपत्ति आली असती, पण आता ती येणार नाही. कारण काँग्रेस-नेते आता वास्तव दृष्टीने जगाकडे पाहूं लागले आहेत. ती ताकद, तें सामर्थ्य त्यांना प्राप्त झालें आहे. आज भारतीयांच्या ठायीं, आपल्या सेनेच्या ठायीं, कार्यकर्त्यांच्या ठायीं जें तेज, जो अभिमान, जो पराक्रम दिसत आहे तो एरवी दिसला नसता.
 आता इतर घटनांचा विचार करूं. भारताची फाळणी झाली ती हिंदुस्थानांतील मुस्लिम जमातीच्या अंध धर्मश्रद्धेमुळे झाली. राष्ट्रनिष्ठा ही इस्लामविरोधी आहे, हाच आग्रह या जमातीने धरला होता. आणि भारतीय मुस्लिम अजूनह विश्व- मुस्लिमवादाच्या घोषणा करतात हे अलअक्सा, राबात या प्रकरणांवरून दिसून आलेंच आहे. बांगला देशांत पाकिस्तानच्या एकंदर लोकसंख्येपैकी दोन- तृतीयांश लोक राहतात. त्यांतील बहुसंख्य मुस्लिम आहेत. तेव्हा फाळणीच्या निर्णयाचें श्रेय बव्हंशीं त्यांचेंच आहे. असे हे बंगाली मुस्लिम आज पाकिस्तानांतून फुटून निघून धर्मातीत राष्ट्रवादाचा अवलंब करण्यास सिद्ध झाले आहेत आणि त्यासाठी अगदी अंतिम त्याग करीत आहेत, हें फार मोठे सुचिन्ह आहे. बांगला नागरिकांनी, त्यांच्या मुक्तिवाहिनीने, पश्चिम पाकिस्तानच्या सैतानी आक्रमणाविरुद्ध जो लढा दिला त्याला खरोखर तोड नाही. त्यांतून त्यांची राष्ट्रभावना शुद्ध सुवर्णासारखी बाहेर पडली आहे. आता बांगला नागरिक भारत हा बव्हंशी हिंदूंचा देश असूनहि त्याच्याशीं पूर्ण सहकार्य करीत आहेत. हा धर्माधिष्ठित राष्ट्रवादाचा, जीनांनी उद्घोषिलेल्या द्विराष्ट्रवादाचा संपूर्ण पराभव असून, इहवादाचा मोठा विजय आहे. बांगला देशाप्रमाणेच सिंध, बलुचिस्तान, पेशावर हे पाकिस्तानचे विभागहि याच मार्गाने वाटचाल करीत असल्याच्या वार्ता येत आहेत. तसें झाल्यास भारताच्या दोन्ही कुशींतल्या कट्यारी निघून जातील आणि या देशाच्या प्रगतीचा मार्ग निर्वेध होईल. हा सर्व इहवादाचा महिमा आहे.
 बांगला देशाच्या या परिवर्तनाचा भारतांतील मुस्लिम जमातीवर परिणाम होऊन तीहि इहवादी होईल अशी आशा करतां येईल काय ? तशीं कांही चिन्हें दिसत आहेत. मुस्लिम लीग, मुस्लिम मजलीस मुशावरत यांच्या नेत्यांनी आणि इतरहि अनेक मुस्लिम संस्थांनी व व्यक्तींनी पाकिस्तानी आक्रमणाचा निषेध करून आपण सर्वस्वीं पंतप्रधान इंदिराबाईंच्या पाठीशी असल्याचे जाहीर केलें आहे. कांही वर्तमानपत्रांनी यांतील प्रामाणिकपणाबद्दल संशय व्यक्त करून याला दुटप्पीपणा म्हटलें आहे. काही उर्दू पत्रांतील लिखाण त्या संशयाला पुष्टि देत आहे. तरीहि स्वतंत्र बांगला देश ही घटना मुस्लिम जमातीच्या दृष्टीने इतकी क्रांतिकारक व इतकी प्रभावी आहे की, भारतीय मुस्लिमांच्या धर्मांध दृष्टींत ती चरचरीत अंजन घातल्यावांचून राहील, असें वाटत नाही. निदान ज्या पाकिस्तानी आधारावर येथील मुस्लिम भारतांत आणखी पाकिस्तान निर्माण करण्याची