पान:इहवादी शासन.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सहा । इहवादी शासन
 

प्रभावी होऊं लागला. 'राइज ऑफ् रॅशनॅलिझम इन् युरोप' या आपल्या ग्रंथांत विल्यम एडवर्ड लेकी याने हा सर्व इतिहास दिला आहे. लेकीने प्रथम हा विषय एका लहान निबंधांत मांडला होता. त्या निबंधाचें नांव 'अद्भुतावरील श्रद्धेचा ऱ्हास' असें होतें. त्यावरून इहवादाचें मर्म काय आहे तें ध्यानांत येईल. सृष्टिघटनांविषयी लोकांत अज्ञान असतें, कार्यकारणभाव त्यांना ज्ञात नसतो, अशा काळी अद्भुतावर, चमत्कारावर, दैवी शक्तीवर त्यांची अंध श्रद्धा असते. त्यामुळे ऐहिक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रांत- राजकारण, अर्थ, समाजरचना, शिक्षण- तो त्या श्रद्धेच्या वर्चस्वानेच निर्णय घेत असतो. हें वर्चस्व नष्ट होऊन प्रत्येक क्षेत्रांत बुद्धि, विज्ञान, अवलोकन, प्रयोग, इतिहास यांच्या साह्याने निर्णय घेणें हा इहवादाचा खरा अर्थ आहे. लेकीने आपल्या ग्रंथांत याचें सविस्तर विवरण केले आहे.
 यावरून हें ध्यानांत येईल की, राष्ट्र, लोकशाही, समाजवाद यांच्या तत्त्वांचे संस्कार जनतेच्या मनावर करणें जितकें आवश्यक असतें तितकेंच इहावादाचे संस्कार करणें आवश्यक असतें. किंबहुना वरील तत्त्वांवर केलेली समाजसंघटना यशस्वी होण्यासाठी इहवादाचा पाया अवश्य असल्यामुळे ते संस्कार करणें जास्त महत्त्वाचें आहे.
 'इहवादी शासन' या प्रस्तुत ग्रंथाच्या लेखनामागला तोच हेतु आहे.
 या ग्रंथाचे स्वरूप काय आहे तें 'विषयप्रवेश' व शेवटी 'पृथ्वीप्रदक्षिणा' या नांवाने केलेला समारोप यांवरून स्पष्ट होईल, म्हणून येथे पुनरुक्ति करीत नाही.
  ग्रंथाचें लेखन व छपाई पूर्ण झाल्यानंतर कांही महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. त्यांचा परामर्श घेणें अवश्य आहे असें वाटल्यावरून, त्यांच्याकडे दृष्टिक्षेप करून ही प्रस्तावना पुरी करतो.
 प्रस्तावना लिहीत असतांनाच बांगला देशाला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मान्यता दिल्याची सुवार्ता आली. इहवादी तत्त्वांच्या व भारताच्या इहवादी प्रगतीच्या दृष्टीने या घटनेला फार मोठा अर्थ आहे. पंतप्रधान इंदिराबाई व काँग्रेसचे नेते इहवादी झाले हा तो अर्थ होय. कोणत्याहि तत्त्वावर अंध श्रद्धा ठेवणें, देशकाल- परिस्थितीचा, त्या तत्त्वांच्या यशापयशाचा, व्यवहार्यतेचा विचार न करता, त्यांना चिकटून राहणें हे इहवादाला व म्हणूनच समाजप्रगतीला घातक असतें. पंडितजींची कम्युनिझमवर अशीच अंध श्रद्धा होती. म्हणूनच कम्युनिस्ट देश आक्रमक असुं शकत नाहीत या सिद्धान्ताला ते कवटाळून बसलें व चीनचें आक्रमण झाले, तरी ते त्याला आक्रमण म्हणेनात. पंतप्रधान इंदिराबाई या श्रद्धेतून मुक्त झाल्या आहेत. म्हणूनच चीनच्या साम्राज्यवादाला त्या जाणूं शकतात. अलिप्तता या तत्त्वाचा पंडितजींना असाच मोह होता. तो मोहहि इंदिराबाईंनी दूर सारला आहे. वेळ आली तर अलिप्ततेचा आम्ही त्याग करूं असें त्या एकदा म्हणाल्याहि होत्या. ही वास्तव, व्यवहारी, बुद्धिवादी दृष्टि नसती, तर त्यांनी रशियाशी करार केला नसता. आणि